बुधवारी लोणीत ‘भव्य शिवार फेरी’चे आयोजन

संगमनेर Live
0
बुधवारी लोणीत ‘भव्य शिवार फेरी’चे आयोजन

◻️ प्रवरा कृषी शास्त्र संस्थेत शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिकांची ‘कृषी ज्ञानयात्रा’


संगमनेर LIVE (​लोणी) | जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ‘प्रवरा कृषी शास्त्र संस्था’ (लोणी), पायरेन्स कृषी विज्ञान केंद्र (बाभळेश्‍वर) आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रवरा कृषी शास्त्र संस्था, लोणी येथे भव्य ‘शिवार फेरी’चे आयोजन करण्यात आले आहे.

‘क्लासरूम टू फील्ड’ (वर्गखोली ते शेत) या अभिनव संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या प्रयोगांची पाहणी करण्याची संधी या निमित्ताने शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर मिळणार असून, ही शिवार फेरी केवळ पाहणीपुरती मर्यादित न राहता शेतकऱ्यांसाठी एक दिशादर्शक ‘कृषी ज्ञानयात्रा’ ठरणार आहे.

​बदलत्या हवामानाच्या पार्श्‍वभूमीवर कमी पाण्यात, कमी खर्चात आणि अधिक उत्पादन घेणे हे आजच्या घडीला शेतकऱ्यांसमोरील मोठे आव्हान बनले आहे. यावर मात करण्यासाठी संस्थेच्या प्रक्षेत्रावर मल्चिंग तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक पध्दतीने मातीविना भाजीपाला उत्पादन, ग्रो बॅगमधील भाजीपाला लागवड, पाणी आणि खतांचा नियंत्रित व संतुलित वापर तसेच सेंद्रिय व जैविक शेतीचे विविध यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी ग्रो बॅगच्या माध्यमातून घेतलेले तब्बल ६० किलो वजनाच्या भोपळ्याचे विक्रमी उत्पादन हे या फेरीचे प्रमुख आकर्षण ठरणार असून, हे प्रयोग शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देण्यास नक्कीच दिशा देतील.

​या शिवार फेरीत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर कोबी, फुलकोबी, झेंडू, वांगी, भेंडी आणि पालेभाज्यांसह वेलवर्गीय कारली, दोडके, घोसाळे व काकडी यांसारख्या विविध भाजीपाला पिकांची थेट प्रात्यक्षिके अभ्यासता येणार आहेत. याशिवाय केळी, आंबा, खजूर, सफरचंद, ॲपल बोर, डाळिंब, पेरू, अंजीर आणि ऊस यांसारख्या नगदी व फळपिकांमधील आधुनिक व्यवस्थापन तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती शास्त्रज्ञ व प्राध्यापकांकडून दिली जाईल. 

केवळ पारंपरिक पीक उत्पादनावर न थांबता शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी संस्थेने या प्रयोगांना कृषीपूरक व्यवसायांची भक्कम जोड दिली आहे. यामध्ये रोपवाटिका (नर्सरी), मशरूम उत्पादन, मधमाशीपालन, गांडूळखत व व्हर्मीवॉश निर्मिती, जैविक व सेंद्रिय निविष्ठांची निर्मिती, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया, फळ-भाजीपाला प्रक्रिया तसेच ‘टाकाऊतून टिकाऊ’ अशा विविध नफ्याच्या उपक्रमांचे थेट प्रात्यक्षिक मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

​विद्यार्थ्यांना केवळ सैध्दांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष जमिनीची निवड, मशागत, लागवड, खत व पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण, काढणीपश्चात हाताळणी आणि थेट बाजारपेठेशी जोडणारे मार्केटिंग तंत्र शिकवले जात आहे. या मॉडेलमुळे विद्यार्थ्यांना जसा उत्पादनापासून बाजारापर्यंतचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो आहे, तसेच हे तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांनाही आपल्या शेतीत अंमलात आणता येणार आहे. कृषी शिक्षण चार भिंतींपुरते मर्यादित न राहता बांधावरील शेतकऱ्यांच्या उपयोगात यावे आणि ‘क्लासरूम टू फील्ड’च्या माध्यमातून कृषी ज्ञानाचा थेट विस्तार व्हावा, हाच या शिवार फेरीचा मुख्य हेतू असल्याचे संस्थेचे संचालक प्रा. डॉ. उत्तमराव कदम यांनी नमूद केले.

संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात असून, भविष्यात उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनाही या कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाणार आहे.

​या भव्य शिवार फेरीस माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. सुस्मिता विखे पाटील, पायरेन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कृषी उद्योजक, महिला बचत गट, युवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पायरेन्सचे सचिव डॉ. निलेश बनकर, तालुका कृषी अधिकारी डॉ. आबासाहेब भोरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अमोल खडके, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वरांजली गाढे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. काजल खंडागळे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. चंद्रकला सोनवणे व सर्व प्राध्यापक परिश्रम घेत आहेत. 

दरम्यान, परिसरातील सर्व शेतकरी बांधव, महिला व युवकांनी बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता लोणी येथील कृषी शास्त्र संस्थेत उपस्थित राहून या शिवार फेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !