संगमनेरात आज घुमणार पारंपरिक वाद्यांचा गजर!
◻️ डीजेला फाटा देत बसस्थानक येथे ७५० वादकांचे 'भव्य महावादन'!
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द ठरलेल्या संगमनेर शहरात गणेशोत्सवानिमित्त पारंपरिक वाद्य संस्कृतीचा अभूतपूर्व सोहळा रंगणार आहे. पारंपरिक वाद्यकलेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून आणि ‘आय लव संगमनेर’ चळवळीच्या वतीने आज, बुधवारी (दि. १६) सायंकाळी ५:३० ते रात्री १० या वेळेत मध्यवर्ती बस स्थानक मैदानावर ‘भव्य महामेळा व महावादन' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्षा डॉ. सौ. मैथिली तांबे यांनी दिली.
स्थानिक कलावंतांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून देण्यासाठी गेल्या वर्षापासून हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या महावादनात शहरातील अग्रगण्य असलेली ‘संगमनेरी तांडव’, ‘हिंदू राजा प्रतिष्ठान’, ‘रुद्र प्रतिष्ठान’, ‘छावा प्रतिष्ठान’ आणि ‘एकलव्य प्रतिष्ठान’ या पाच नामांकित ढोल-ताशा पथकांतील सुमारे ७५० तरुण-तरुणी एकत्र येणार आहेत. हे सर्व वादक शिस्तबध्द पद्धतीने एकाच लयीत आणि तालावर नादब्रह्माचा भव्य आविष्कार संगमनेरकरांसमोर सादर करतील.
महाराष्ट्रात अशा प्रकारचा सामूहिक महावादनाचा उपक्रम सर्वप्रथम संगमनेरमध्ये यशस्वीपणे सुरू करण्यात आला होता. या उपक्रमामुळे संगमनेरच्या वादकांना नवी दिशा मिळाली असून येथील कलाकार आज गुजरात (सोमनाथ), तामिळनाडू, कोलकाता आणि हिमाचल प्रदेश अशा देशभरातील विविध राज्यांमध्ये जाऊन आपल्या कलेचा ठसा उमटवत आहेत. या सर्व गुणी कलाकारांच्या कौशल्याची आणि वाद्यकलेची अनुभूती आज एकाच छताखाली संगमनेरकरांना घेता येणार आहे.
या सांस्कृतिक सोहळ्यास माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे, सौ. दुर्गा तांबे, नूर मोहम्मद शेख यांच्यासह संगमनेर शहर व तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, आज सायंकाळी रंगणाऱ्या या भव्य वाद्योत्सवाचा आनंद घेण्यासाठी संगमनेर शहर व परिसरातील नागरिक, युवक आणि युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
“सध्या राज्यभरात डीजेच्या कर्कश आवाजामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर तीव्र आक्षेप नोंदवले जात आहेत. महाराष्ट्र ही संतांची आणि समृद्ध संस्कृतीची भूमी असून आपल्याकडे पारंपरिक वाद्यांचा संपन्न वारसा आहे. विशेषतः ढोल-ताशाच्या निनादाला आज संपूर्ण देशभरातून मोठी पसंती मिळत आहे. या अस्सल पारंपरिक लोककलेला आणि कलावंतांना प्रोत्साहन देणे हाच या महावादनाचा मुख्य उद्देश आहे. संगमनेरकरांनी या सांस्कृतिक उत्सवात सहभागी होऊन पारंपरिक कलेला दाद द्यावी.” असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.