आपत्कालीन मदतीसाठी युवकांनी सदैव सज्ज राहावे - डॉ. जयश्री थोरात

संगमनेर Live
0
आपत्कालीन मदतीसाठी युवकांनी सदैव सज्ज राहावे - डॉ. जयश्री थोरात

​◻️ ‘एसएमबीटी’मध्ये आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | सध्याच्या गतिमान आणि धावपळीच्या जीवनशैलीत अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी घाबरून न जाता संयमाने तात्काळ प्रथमोपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला वेळेत वैद्यकीय मदत मिळेपर्यंत युवकांनी स्वतः पुढाकार घेऊन प्राथमिक उपाययोजना कराव्यात, जेणेकरून एखाद्या व्यक्तीचा अमूल्य जीव वाचवता येईल, असे आवाहन युवक काॅग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केले.

संगमनेर तालुका युवक काॅग्रेसच्या वतीने येथील ‘एसएमबीटी दंत महाविद्यालय’ येथे तालुक्यातील युवकांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

​याप्रसंगी डॉ. रुचिरा खानसे, डॉ. कल्पेश पारख, डॉ. मीरा, डॉ. पद्मनाभन, अविनाश आव्हाड, सोमनाथ गुंजाळ, सुविधा अरासिध्द यांच्यासह युवक काॅग्रेसचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​आपल्या मनोगतात डॉ. जयश्री थोरात पुढे म्हणाल्या की, बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यविषयक समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कुटुंबात अथवा परिसरात हृदयविकाराचा झटका, अपघाती दुखापत, चक्कर येणे, सर्पदंश किंवा आकडी (फिट्स) येण्यासारख्या घटना घडल्यास अनेकदा लोक गोंधळून जातात. मात्र, अशा प्रसंगी प्राथमिक उपचार अवगत असल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीचा अनमोल वेळ सत्कारणी लागून प्राण वाचू शकतात. त्यामुळे समाजातील प्रत्येक सजग तरुणाने अशा आपत्कालीन मदतीसाठी नेहमी तत्पर राहिले पाहिजे. असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

​शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. रुचिरा खानसे यांनी हृदयविकाराच्या झटक्यावेळी घ्यावयाच्या दक्षतेविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, हार्ट अटॅक आल्यास रुग्णाचा श्‍वासोच्छ्वास आणि रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ छातीवर योग्य दाबाने ‘पंपिंग’ (सीपीआर) करणे अत्यावश्यक ठरते. तसेच, एखाद्या रुग्णाला चक्कर अथवा फिट आली असल्यास किंवा विषबाधा झाली असल्यास त्याला बळजबरीने पाणी पाजण्याचा प्रयत्न करू नये, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

​पक्षाघात (पॅरालिसिस) आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर प्रसंगांमध्ये घटनेनंतरचा सुरुवातीचा काळ म्हणजेच ‘गोल्डन टाईम’ अत्यंत निर्णायक असतो, असे सांगत या वेळेत योग्य प्रथमोपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता कैक पटींनी वाढते, असा विश्‍वास डॉ. कल्पेश पारख यांनी व्यक्त केला.

​या एकदिवसीय कार्यशाळेत उपस्थित युवकांना हार्ट अटॅक, रस्ते अपघात, सर्पदंश, विषबाधा, उष्माघात (सनस्ट्रोक), भाजणे आणि फिट येणे यांसारख्या गंभीर परिस्थितींमध्ये करावयाच्या तातडीच्या उपाययोजनांचे सविस्तर प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. 

दरम्यान, या शिबिरामुळे संकटसमयी योग्य वैद्यकीय प्रतिसाद देण्याचा आत्मविश्‍वास तरुणांमध्ये निर्माण झाला असून हे प्रशिक्षण भावी आयुष्यात अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !