संगमनेर नगरपरिषदेच्या लोकार्पण सोहळ्याआधीच श्रेयवादाचा भडका!
◻️ “स्वतःचा निधी आणा, मगच श्रेय घ्या,” महायुतीचा सत्ताधाऱ्यांना टोला
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर शहरात महिलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून (डीपीसी) तब्बल ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यातून शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. असा दावा करण्यात येत आहे.
मात्र, या विकासकामावरून आता शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “विरोधकांनी (नगरपरिषदेतील सत्ताधारी) महायुती सरकारच्या निधीवर आपली राजकीय पोळी भाजू नये; स्वतः निधी आणून दाखवावा आणि मगच कामाचे श्रेय घ्यावे,” अशा शब्दांत शिवसेना व महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
गेल्या काही काळापासून संगमनेर शहरातील वाढत्या चोऱ्या, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि सार्वजनिक शांतता टिकवण्यासाठी शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची मागणी सातत्याने होत होती. आमदार अमोल खताळ यांनी ही निकड ओळखून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. पालकमंत्र्यांनी या मागणीची त्वरित दखल घेत जिल्हा नियोजन समितीतून सुमारे ९९ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केला.
या मंजूर निधीतून शहरातील अकोले नाका, त्रिमूर्ती चौक, जनता नगर कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, चावडी चौक, तीन बत्ती चौक, चंद्रशेखर चौक तसेच नगरपालिका कोर्ट इमारत यांसारख्या प्रमुख, वर्दळीच्या आणि संवेदनशील भागांमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आली आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक हालचाली पोलिसांच्या थेट निगराणीखाली येणार असून, संशयितांचा शोध घेणे, चोऱ्यांना प्रतिबंध करणे, महिलांना सुरक्षित वातावरण देणे आणि गुन्ह्यांचा जलद तपास लावणे पोलिसांसाठी अधिक सुलभ होणार आहे.
सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण व श्रेयवादावरून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विरोधकांवर कडाडून टीका केली आहे. पत्रकात म्हटले आहे की, “शहराला सीसीटीव्हीचे संरक्षण कवच देण्याचा साधा विचारही आधीच्या सत्ताधाऱ्यांना कधी सुचला नाही. मात्र, न केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याची विरोधकांची जुनी खोड आहे.” अशी खरमरीत टीका केली आहे.
दरम्यान, “मोठमोठी स्वप्ने दाखवून पालिकेची सत्ता मिळवणाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांत स्वतःच्या ताकदीवर एकही विकासकाम करता आलेले नाही. आपले हेच अपयश झाकण्यासाठी महायुती सरकारने आणलेल्या निधीवर स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. महायुती सरकार आल्यापासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून संगमनेर तालुका व शहरात मोठ्या प्रमाणावर विकासनिधी खेचून आणला जात आहे,” असा दावाही महायुतीकडून करण्यात आला आहे.