“पदासाठी नव्हे, पक्षासाठी काम करा; व्यक्तिगत निष्ठेपेक्षा पक्षनिष्ठाच सर्वोच्च!”

संगमनेर Live
0
“पदासाठी नव्हे, पक्षासाठी काम करा; व्यक्तिगत निष्ठेपेक्षा पक्षनिष्ठाच सर्वोच्च!”

◻️ ​डॉ. सुजय विखे पाटलांचा झेडपीच्या ७५ पैकी ६० जागा जिंकण्याचा निर्धार 


संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | “भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीचा मूळ मंत्र ‘राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि मी शेवटी’ हा आहे. पदे ही केवळ मिरवण्यासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी नसून त्यातून तळागाळातील सामान्य माणसाचे काम झाले पाहिजे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी केवळ पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची वाट न पाहता जनतेच्या प्रश्नांवर आणि सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. नेत्यांप्रती आदर असला तरी कार्यकर्त्यांची सर्वोच्च निष्ठा ही भारतीय जनता पक्षाशीच असली पाहिजे,” असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

​प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर येथे आयोजित भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत डॉ. विखे पाटील मार्गदर्शन करत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने त्यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर दिशादर्शन केले.

​शासकीय योजनांचा थेट लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर देत डॉ. विखे पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचे उदाहरण दिले. केवळ योजना जाहीर करून चालत नाही, तर प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिर्डी मतदारसंघात सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची यादी तयार करून, लाभाची नेमकी रक्कम नमूद असलेली पत्रे थेट शेतकऱ्यांच्या घराघरांत पोहोचविली गेली. एखाद्या शेतकऱ्याला दीड-दोन लाखांचा लाभ झाला, तर तो कोणामुळे मिळाला याची जाणीव त्याला करून देणे ही कार्यकर्त्यांची मूलभूत जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

​संघटनात्मक शिस्तीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, केवळ नावापुरती पदे घेऊन मिरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जिल्हा नियोजन समितीसह विविध पदांवर कार्यरत नेते, तालुकाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष आणि बूथस्तरावरील कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष कामाचे नियमित मूल्यमापन होईल. संघटना स्वतःहून वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही देत, “मी स्वतः मोठा होण्यापेक्षा माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. स्वतःसाठी पदे मिळवण्यापेक्षा संघटनेत नवे कार्यकर्ते घडवणे हेच नेतृत्वाचे खरे कर्तव्य आहे,” असा कानमंत्र त्यांनी दिला.

​जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी महायुती सरकार कटिबध्द आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे डिंबे-माणिकडोह बोगदा, साकलाई उपसा सिंचन योजना आणि कुकडी कालव्यांच्या नूतनीकरणाच्या कामांना गती मिळाली असून त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. आपल्या पुढच्या पिढीच्या आणि हक्काच्या पाण्याचा हा लढा असून आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचे नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

​अहिल्यानगर महानगरपालिकेत पक्षाचे २५ नगरसेवक निवडून आल्याने भाजपची ताकद सिध्द झाली आहे, याचा पुनरुच्चार करत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीने कामाला लागण्याचे आवाहन केले. याच एकजुटीने काम केल्यास आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ७५ पैकी ६० हून अधिक जागांवर भाजपचा विजय होईल आणि अहिल्यानगर जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष विराजमान होईल, असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ​या जिल्हा कार्यकारिणी बैठकीस दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते ओबीसी युवा मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !