जिल्ह्याला उद्योगाचे माहेरघर बनवण्याचा संकल्प - डॉ. सुस्मिता विखे पाटील

संगमनेर Live
0
जिल्ह्याला उद्योगाचे माहेरघर बनवण्याचा संकल्प - डॉ. सुस्मिता विखे पाटील

◻️ लोणीतील ‘बिल्डिंग प्रवरा’ एक्स्पोत विद्यार्थ्यांची २.२५ कोटींची विक्रमी उलाढाल


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “नोकरी मागणारे नाही, तर रोजगार देणारे उद्योजक घडूया आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करूया,” या संकल्पाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिध्द करून दाखवले आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ‘बिल्डिंग प्रवरा’ विद्यार्थी एक्स्पोमध्ये विद्यार्थ्यांनी तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांची विक्रमी उलाढाल करत नवा इतिहास रचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत' व स्वदेशीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीरीत्या संपन्न झाला.

​‘थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली’ (जागतिक विचार, स्थानिक कृती) या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विविध शाळा आणि महाविद्यालयांतील सुमारे १ हजार विद्यार्थ्यांनी १७५ स्टॉल्स उभारून व्यावसायिक कौशल्याची चुणूक दाखवली. गतवर्षीच्या पावणेदोन कोटींच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांनी २ कोटी २५ लाखांची थेट उलाढाल तर केलीच, शिवाय मोठ्या प्रमाणावर आगाऊ (ॲडव्हान्स) ऑर्डर्सही मिळवल्या. या तीन दिवसांत विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन थेट ग्राहक संवाद, विक्री व्यवस्थापन, डिजिटल प्रसिध्दी आणि प्रत्यक्ष व्यवसायातील अडचणींवर मात करण्याचे मोलाचे धडे गिरवले.

​या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा उपकरणे, दुग्धजन्य पदार्थ, कृषी प्रक्रिया उद्योग, पर्यावरणपूरक वस्तू, टाकाऊपासून टिकाऊ साहित्य आणि आकर्षक रंगीबेरंगी फिश टँक विक्रीसाठी ठेवले होते, ज्यांना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला. विशेषतः दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर मूकबधिर विद्यार्थ्यांनी तयार केलेले पर्यावरणपूरक आकाशकंदील, रंगीबेरंगी पणत्या आणि उत्कृष्ट हस्तकलेच्या वस्तूंनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले; हजारो पणत्या आणि कंदिलांची विक्रमी विक्री करत या विशेष विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली.

​यंदा दुष्काळी परिस्थितीचे सावट असतानाही ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी दाखवलेला आत्मविश्‍वास वाखाणण्याजोगा ठरला. शेतीमालाला थेट बाजारपेठ न मिळणे ही मोठी अडचण असताना, स्वतः उत्पादित केलेला माल थेट ग्राहकापर्यंत नेल्यास मध्यस्थांशिवाय कसा नफा मिळवता येतो, याचे उत्तम मॉडेल विद्यार्थ्यांनी कृतीतून मांडले. स्टॉलधारक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगताना नमूद केले की, “सुरुवातीला व्यवसाय कसा करायचा याची भीती होती; पण स्टॉलवर ग्राहकांशी थेट संवाद साधताना ती भीती पूर्णपणे दूर झाली. जे पुस्तकात शिकता आले नाही, ते या तीन दिवसांत प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळाले.”

​समारोप प्रसंगी बोलताना संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या की, अहिल्यानगर जिल्हा हे उद्योगाचे माहेरघर व्हावे, हे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वप्न आहे. त्या दिशेने ‘बिल्डिंग प्रवरा' हे अतिशय भक्कम पाऊल ठरत आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या सहकार्यातून ग्रामीण भागही देशासमोर विकासाचे मॉडेल उभे करू शकतो, हे या उपक्रमाने दाखवून दिले असून पुढील वर्षी या एक्स्पोची व्याप्ती आणखी वाढवली जाईल,” असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमास जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या विश्‍वस्त सुवर्णाताई विखे पाटील, पायरेन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया विखे पाटील आदींसह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

दरम्यान, उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, डॉ. उत्तमराव कदम, सौ. लीलावती सरोदे, समन्वयक डॉ. महेश खर्डे, डॉ. आर. ए. पवार, प्रा. विजय आहेर यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व संयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !