पालकमंत्र्यांच्या आश्वासनानतंर अकोल्यातील पेसा कर्मचाऱ्यांचे १७ दिवसांचे उपोषण स्थगित!
◻️ इतर १२ जिल्ह्यांप्रमाणे अहिल्यानगरमध्येही अंमलबजावणीचे करण्याचे दिले निर्देश
संगमनेर LIVE (अकोले) | पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत अधिकरी आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्या मागण्याबाबत मागील १७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. इतर बारा जिल्हयाप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यवाही व्हावी आणि आंदोलकांचे गुन्हे मागे घेण्याबातची प्रक्रीया सुरू करण्याची ग्वाही उपोषणकर्त्यांना दिली.
अकोले पंचायत समितीच्या कार्यालया समोर मागील सतरा दिवसांपासून पेसा मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. कार्यरत व कार्यमुक्त असलेल्या पेसा मानधन कर्मचारी यांना त्याच पदावर त्याच जागी तात्काळ सेवेत सामावून घ्यावे. आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत. सर्व पेसा मानधन कर्मचारी याची अद्यापपर्यतची सेवा कायम करण्यात यावी आशा मागण्या घेवून अक्षय बांबळे, प्रवीण सुकटे, नवनाथ सुकटे, प्रणिता आंबेकर, अश्विनी डगळे, मनिषा बांबेरे, विद्या गोडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यानी उपोषण सुरू केले होते.
मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, सुनिता भांगरे यांच्यासह महसूल पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यानी उपोषण स्थळी जावून उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्याचे म्हणणे ऐकून घेतले.
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्रशासनाची भूमिका मंत्री विखे पाटील यांच्यापुढे विषद केली. इतर बारा जिल्हयाप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यवाही करण्याबाबत धोरण असेल तर त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आदेशातील जाचक अटी काढून टाकणे तसेच आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय करेल आशी ग्वाही दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगीत करण्याचा निर्णय केला.
विशेष म्हणजे पंचायत समितीच्या दारासमोर आंदोलन सतरा दिवस सुरू असताना सुध्दा तहसिदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले. आंदोलनकर्त्यानी सुध्दा हिच बाब मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.