पशुधनाच्या सर्वेक्षणातून चारा उत्पादनासाठी ‘अहिल्यानगर पॅटर्न’ सज्ज!
◻️पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने तालुकानिहाय सूक्ष्म नियोजन
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | पावसाअभावी निर्माण झालेल्या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील पशुधनाला सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने युध्दपातळीवर नियोजन सुरू केले आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात चारा उत्पादनाचा विशेष ‘अहिल्यानगर पॅटर्न’ राबविला जात असून, या मोहिमेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या पथकांनी आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ६४ हजार पशुपालकांपर्यंत थेट पोहोचून वस्तुस्थितीदर्शक माहिती संकलित केली आहे. दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या या जिल्ह्यात पशुधनाची मोठी संख्या लक्षात घेता, चारा उपलब्धतेचे हे सूक्ष्म नियोजन जनावरांसाठी मोठा आधार ठरणार आहे.
जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने चारा पिके धोक्यात आली असून, जनावरांचे संगोपन करणे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात टंचाई आढावा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये चारा टंचाईबाबत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर आल्या होत्या. केवळ कागदावरील आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रशासनाने प्रत्यक्ष बांधावर जाऊन तालुकानिहाय स्वतंत्र आराखडा तयार करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासकीय यंत्रणेने तातडीने प्रत्यक्ष सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली.
या सर्वेक्षणादरम्यान प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातील पशुपालक, उपलब्ध जनावरांची संख्या, चाऱ्याची प्रत्यक्ष मागणी आणि चारा उत्पादन घेणारे शेतकरी यांची परिपूर्ण माहिती गोळा केली आहे. पशुसंवर्धन विभागाने यापूर्वी केलेल्या जनावरांच्या ई-टॅगिंगच्या आधारे या नोंदींची पुन्हा प्रत्यक्ष पडताळणी केली जात असल्याने चाऱ्याच्या गरजेचा अचूक अंदाज बांधणे प्रशासनाला शक्य झाले आहे. यासोबतच शासकीय योजनेतून मोफत बियाणे घेऊन दर्जेदार चारा उत्पादन करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली असून, यामुळे गरजेनुसार चारा उत्पादनाला गती देणे सोपे होणार आहे.
कमी पाण्यात आणि अत्यंत कमी कालावधीत पोषक चारा उपलब्ध व्हावा यासाठी आधुनिक ‘हायड्रोपोनिक्स’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी विशेष भर दिला आहे. पशुसंवर्धन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तातडीने सुरू करावा, यासाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. अचूक आकडेवारी, स्थानिक पातळीवरील नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या एकत्रित मिलाफातून अहिल्यानगर जिल्हा दुष्काळी परिस्थितीवर मात करून पशुधनाचे रक्षण करण्यास सज्ज झाला आहे.
“दुष्काळी किंवा टंचाईच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे पशुधन वाचवणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. केवळ चारा छावण्यांवर अवलंबून न राहता, शेतकऱ्यांच्या पातळीवरच चारा उत्पादनाला गती मिळावी यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू आहे. अचूक आकडेवारी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर हा टंचाई काळ यशस्वीपणे हाताळला जाईल.” असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.