डॉ. सुजय विखे पाटलांची ‘कोल्हापूर उत्तर’च्या प्रभारीपदी नियुक्ती!
◻️पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठी जबाबदारी
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर पक्षाने आणखी एक महत्त्वाची संघटनात्मक धुरा सोपविली आहे. आगामी पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर त्यांची ‘कोल्हापूर उत्तर’ विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (१२ ऑक्टोबर) अधिकृत पत्र जारी करून ही घोषणा केली आहे.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची जबाबदारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे सोपवून पक्षाने त्यांच्या संघटन कौशल्यावर पुन्हा एकदा मोठा विश्वास दाखवला आहे. स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत समन्वय साधणे, कार्यकर्त्यांची सक्षम फळी उभारणे आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने रणनीतीची काटेकोर आखणी करणे, या सर्व प्रक्रियेत त्यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
डॉ. विखे पाटील यांच्याकडे सध्या भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी असून, त्यासोबतच पक्षाच्या ‘आयुष्मान भारत कक्षा’चे प्रभारी म्हणूनही ते सक्रियपणे कार्यरत आहेत. आता कोल्हापूर उत्तरचे प्रभारीपद मिळाल्यामुळे त्यांच्या संघटनात्मक कार्यक्षेत्राचा परीघ अधिक विस्तारला असून पक्षाने त्यांच्यावर दाखविलेल्या या विश्वासामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या वाढत्या प्रभावाची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या नव्या व महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा मोठा वर्षाव होत आहे.