दिल्लीत शिर्डीच्या खेळाडूंनी १२ देशांच्या स्पर्धेत जिंकली १२ पदके!

संगमनेर Live
0
दिल्लीत शिर्डीच्या खेळाडूंनी १२ देशांच्या स्पर्धेत जिंकली १२ पदके!

◻️ ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य पदकांसह साईबाबा संकुलाचे यश


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘वर्ल्ड केटलबेल चॅम्पियनशिप २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शिर्डीच्या श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या खेळाडूंनी अद्वितीय कामगिरी करत ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १२ पदके पटकावली आहेत. या घवघवीत यशामुळे शिर्डीसह संपूर्ण देशाची मान जागतिक क्रीडा पटलावर उंचावली आहे.

​५ ते ८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत यजमान भारतासह रशिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, पोलंड, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान, थायलंड, मंगोलिया आणि सिंगापूर अशा १२ देशांतील ३०२ अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत साईबाबा संकुलाच्या ९ खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या व ताकदीच्या जोरावर सर्व पदके आपल्या नावे केली. या खेळाडूंना प्रशिक्षक श्रीमती अंशु तारावत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

​खेळाडूंच्या पदकांच्या वर्षावाबरोबरच श्री साईबाबा संस्थानचे क्रीडा संचालक डॉ. विक्रम सातपुते यांनी ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ केटलबेल लिफ्टिंग’ ची अत्यंत प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. ​जागतिक मंचावर देदिप्यमान यश मिळवून शिर्डीत परतलेल्या सर्व खेळाडूंचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. खेळाडूंनी सर्वप्रथम श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.

​त्यानंतर संस्थानच्या मुख्य कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सर्व विजेते खेळाडू, मार्गदर्शक आणि क्रीडा संचालकांचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंनी शिर्डी आणि देशाची मान उंचावली असून, ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संस्थान सदैव पाठीशी राहील, असा विश्वास गाडीलकर यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, ​या गौरव सोहळ्यास कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, अतुल वाघ, अविनाश कुलकर्णी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष औताडे आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !