संगमनेर आगाराला मंजूर २५ इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बस पैकी १० बस दाखल!

संगमनेर Live
0

संगमनेर आगाराला मंजूर २५ इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बस पैकी १० बस दाखल!
आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ६ ’शिवाई’ ई-बसचे लोकार्पण




​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर परिसरातील प्रवाशांचा प्रवास आता अधिक गतिमान, प्रदूषणमुक्त आणि आरामदायी होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आणि आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून संगमनेर आगारासाठी तब्बल २५ आधुनिक इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस मंजूर झाल्या आहेत. 

यापैकी पहिल्या टप्प्यात १० बसेस आगारात दाखल झाल्या असून, यातील ६ बसेसचे पूजन आमदार अमोल खताळ आणि सौ. नीलम खताळ यांच्या हस्ते संपन्न झाले. या लोकार्पण सोहळ्यानंतर या बसेस प्रवाशांच्या प्रत्यक्ष सेवेत रुजू झाल्या आहेत.

​यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले, “नवीन इलेक्ट्रिक बससेवेमुळे संगमनेरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक आणि पर्यावरणपूरक स्वरूप प्राप्त झाले आहे. वाढत्या उष्णतेच्या आणि प्रवासाच्या काळात सामान्य प्रवाशांना माफक दरात वातानुकूलित व सुरक्षित प्रवासाची सुविधा याद्वारे उपलब्ध झाली आहे.”

​लोकार्पण सोहळ्यानंतर आमदार खताळ यांनी केवळ भाषण न करता स्वतः नव्या ‘शिवाई’ बसमधून नाशिक रस्त्याकडे प्रवास केला. या प्रत्यक्ष प्रवासादरम्यान त्यांनी बसमधील आसनव्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा आणि इतर तांत्रिक सुविधांची बारकाईने पाहणी केली.

​लोकार्पण झालेल्या ६ बसपैकी पुणे मार्गावरील वाढती गर्दी लक्षात घेता दर ३० मिनिटांच्या अंतराने नियमित फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे संगमनेर-पुणे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. उर्वरित बसेस टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील इतर प्रमुख मार्गांवर धावणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे यांनी दिली.

​नवीन बसेस सुरू होत असतानाच आगार परिसरातील पायाभूत सुविधांचा प्रश्नही आमदार खताळ यांनी लावून धरला. बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसह अहोरात्र सेवा देणारे चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच स्थानकावरील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता राखावी, अशा स्पष्ट आणि कडक सूचना आमदार खताळ यांनी आगार प्रमुख निलेश बेंडकुळे यांना दिल्या.

दरम्यान, ​या लोकार्पण सोहळ्याला शिवसेना-महायुतीचे ज्येष्ठ नेते तसेच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, आगारातील कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगमनेरच्या ताफ्यात दाखल झालेल्या या आधुनिक बससेवेमुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.

​ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रध्दांजली!

​भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच या लोकार्पण कार्यक्रमात शोककळा पसरली. आमदार अमोल खताळ यांच्यासह उपस्थित महायुतीचे पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. मराठी व हिंदी सिनेसृष्टी आपल्या सशक्त अभिनयाने समृध्द करणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नाना पाटेकर यांचे जाणे ही कधीही न भरून निघणारी हानी असल्याचे आमदार खताळ यांनी यावेळी नमूद केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !