‘विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव' निवड समितीवर डॉ. संतोष खेडलेकर
◻️ सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून अध्यादेश जारी
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | महाराष्ट्र शासनाच्या वतीने तमाशा क्षेत्रातील प्रदीर्घ आणि अद्वितीय योगदानासाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान म्हणजेच ‘विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठीच्या राज्यस्तरीय निवड समितीवर संगमनेर येथील ज्येष्ठ लोककला अभ्यासक आणि लेखक डॉ. संतोष खेडलेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने आज शासन निर्णय (अध्यादेश) जारी करून या नवीन समितीची अधिकृत घोषणा केली असून, डॉ. खेडलेकर यांच्या या निवडीमुळे संगमनेरसह अवघ्या उत्तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातून त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गुरुवार दि. ८ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत डॉ. संतोष खेडलेकर यांच्यासह पद्मश्री रघुवीर खेडकर, विठाबाई नारायणगावकर यांच्या ज्येष्ठ कन्या व नामवंत तमाशा कलावती मंगला बनसोडे, आतांबर शिरढोणकर, लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे आणि डॉ. श्यामल गरुड यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
पारंपरिक लोककलेचा समृध्द वारसा जपणाऱ्या आणि तमाशा क्षेत्रात आयुष्यभर मोलाची सेवा देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचा यथोचित गौरव करण्यासाठी सन २००६ पासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. दहा लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या सर्वोच्च पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. संतोष खेडलेकर हे गेली अनेक दशके महाराष्ट्रातील लोककला आणि तमाशा संस्कृतीवर सखोल संशोधन केले आहे. तमाशाविश्वात मैलाचा दगड ठरलेल्या वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर तसेच तमाशाच्या साडेतीनशे वर्षांच्या स्थित्यंतरावर त्यांनी लिहिलेला चरित्रग्रंथ राज्यभरात गाजला.
याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या ‘तमाशा कलावंत तक्रार निवारण समिती’वर त्यांनी प्रदीर्घ काळ काम करून उपेक्षित कलावंतांचे प्रश्न, मानधन, पेन्शन आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समिती’वर, तसेच साहित्य क्षेत्रातील देशातील सर्वोच्च अशा ‘साहित्य अकादमी पुरस्कार निवड समिती’वर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरही कार्य केले आहे. नुकतीच त्यांना प्रतिष्ठेची ‘कुसुमाग्रज फेलोशिप’ही जाहीर झाली होती.
दरम्यान, तमाशा आणि लोककलेच्या नाडीची अचूक जाण असणाऱ्या डॉ. संतोष खेडलेकर यांच्या या निवडीचे सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. राज्यातील लोककला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.