कोल्हार येथे सोमवारी छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण!
◻️पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण; डॉ. सुजय विखे पाटील राहणार उपस्थित
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | कोल्हार-भगवतीपूर (ता. राहाता) परिसरातील शिवप्रेमींची बहुप्रतीक्षित इच्छा अखेर पूर्ण होत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुमारे दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे लोकार्पण होणार असून, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील हे यावेळी उपस्थिती राहणार आहे.
स्थानिक नागरिकांच्या अनेक वर्षांच्या अखंड पाठपुराव्यानंतर नगर-मनमाड महामार्गालगत कोल्हार बसस्थानकाच्या प्रांगणात हा देखणा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून साकारलेला हा भव्य पुतळा संपूर्ण परिसराच्या सौंदर्यात व वैभवात भर ठरणार आहे.
या सोहळ्याचे औचित्य साधून कोल्हार-लोणी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून कार्यक्रमस्थळापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी, पारंपरिक वाद्यांचा गजर, शिवकालीन वेशभूषेतील मावळे, सरदार आणि जिवंत देखाव्यांमुळे ही मिरवणूक उपस्थितांचे लक्ष वेधून घेईल. यानंतर अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने ‘शिवशंभो गर्जना’ हा प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यामधून शिवकालीन शौर्यगाथा आणि स्फूर्तीदायक गीतांचे सादरीकरण होणार आहे.
दरम्यान, या ऐतिहासिक क्षणासाठी कोल्हार-भगवतीपूर परिसर भगव्या पताकांनी सजला असून, प्रमुख रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोल्हार, भगवतीपूरसह संपूर्ण पंचक्रोशीतील शिवप्रेमी, ग्रामस्थ आणि तरुणाईच्या सहभागातून सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, नागरिकांनी या मंगल प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.