​विभागीय फुटबॉल स्पर्धेत ‘प्रवरा कन्या विद्या मंदिर’चे निर्विवाद वर्चस्व

संगमनेर Live
0
विभागीय फुटबॉल स्पर्धेत ‘प्रवरा कन्या विद्या मंदिर’चे निर्विवाद वर्चस्व

◻️राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिन्ही संघांची दिमाखात निवड


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | शालेय क्रीडा क्षेत्रात आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या येथील ‘प्रवरा कन्या विद्या मंदिर’च्या विद्यार्थिनींनी विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. १४, १७ आणि १९ वर्षांखालील अशा तिन्ही वयोगटांमध्ये अजिंक्यपद पटकावत विद्यालयाने यशाची ऐतिहासिक हॅट्ट्रिक नोंदवली. या दैदिप्यमान विजयाच्या जोरावर तिन्ही संघांची आता राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी दिमाखात निवड झाली आहे.

​पुणे व लोणी येथे संपन्न झालेल्या या विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत प्रवराच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले. १४ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत प्रवराच्या संघाने आक्रमक चाली रचत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संघाचा ८-० अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. तर १९ वर्षांखालील गटातही प्रवराच्या रणरागिणींनी जबरदस्त खेळाचे सातत्य राखत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संघावर ४-० ने मात करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. याशिवाय १७ वर्षांखालील गटात झालेल्या चुरशीच्या व अटीतटीच्या लढतीत प्रवरा कन्या विद्या मंदिरने पुणे ग्रामीण संघाचा १-० असा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मैदानावर खेळाडूंनी दाखवलेला अप्रतिम सांघिक समन्वय, चपळता आणि अचूक चेंडू नियंत्रणाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना नामोहरम केले.

​या स्पर्धेत विजयी ठरलेल्या १४ वर्षांखालील संघात दूर्वा काकडे, पूनम मिसाळ, सुकन्या मुरकुंडे, प्रतिज्ञा सरनोबत, आराध्या सुट्टे, अर्पिता वालतुरे, श्रीशा लबडे, हिरल जैन, साक्षी कोळपे, अनुष्का बेनके, वैष्णवी रेपाळे, ज्ञानेश्‍वरी तमनर, तनुश्री केजभट, कुंजन चव्हाण, प्रतीक्षा आंधळे, श्रेयसी शिंदे व दिव्या नाईक यांचा समावेश होता. 

तसेच १७ वर्षांखालील गटात प्रणिती ढवळे, श्रध्दा विधाते, ऋतुजा वालतुरे, ईश्‍वरी बडक, सोनम माने, खुशी गवळी, अक्षरा दुबिले, सृष्टी करवंदे, समृध्दी कुरंदळे, अनन्या काळे, आर्या जाधव, ज्ञानेश्‍वरी बेनके, निर्मिती दराडे, शामल वावरे, रिध्दी घोडेचोर व आरुषी कचरे यांनी चमकदार कामगिरी केली. 

तर १९ वर्षांखालील संघात सोनाक्षी सातव, संस्कृती गायके, कार्तिकी आमटे, ज्ञानेश्‍वर रिंधे, आरती शेळके, संजीवनी कोळपे, अक्षरा सोलंकर, प्रगती आंधळे, स्वरा हिरवे, स्नेहल शिंदे, अनुष्का जमदाडे, आर्या सोळुंके, अनुष्का मडके, आराध्या तासकर, देविका गायकवाड, स्वराली लाटे, ज्ञानेश्‍वरी मिसाळ व मनस्वी ढमाले यांचा सहभाग होता.

​या सर्व यशस्वी खेळाडूंना प्राचार्या विद्या घोरपडे यांच्यासह क्रीडा मार्गदर्शक स्नेहल सुतार, कल्पना कडू, श्‍वेता पाटील आणि सुचित्रा तांबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

दरम्यान, विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, भारत घोगरे, शिवानंद हिरेमठ, डॉ. प्रदीप दिघे, सौ. लीलावती सरोदे, डॉ. महेश खर्डे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व क्रीडाप्रेमींनी विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !