गोधेगावात बिबट्याच्या हल्ल्यात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
◻️आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याकडून घटनास्थळी भेट
संगमनेर LIVE (नेवासा) | नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने झोपलेल्या शेतमजुरावर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार केल्याची अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी हल्ल्यात सुरेश अहिरे (वय ५५) या शेतमजुराचा मृत्यू झाला. आजवर जनावरांवर हल्ले करणाऱ्या बिबट्याने थेट माणसालाच सावज बनवल्याने गोधेगावसह संपूर्ण नेवासा तालुक्यात तीव्र घबराट पसरली आहे.
पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी पाठवलेल्या माहितीनुसार, गोधेगाव येथील स्थानिक शेतकरी काशिनाथ औटे यांच्या शेतातील शेडमध्ये सुरेश अहिरे नेहमीप्रमाणे झोपलेले होते. गुरुवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने गाढ झोपेत असलेल्या अहिरे यांच्यावर अचानक झडप घातली आणि त्यांना फरफटत शेतात ओढून नेले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.
शुक्रवारी सकाळी अहिरे शेडमध्ये न दिसल्याने परिसरातील नागरिकांनी शोधाशोध सुरू केली. शनिवारी (दि. १७) जवळच असलेल्या कपाशीच्या शेतात त्यांची चप्पल आढळून आली. त्यामुळे बिबट्यानेच हल्ला केल्याचा संशय बळावला. ग्रामस्थांनी तातडीने याची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन शोध घेत असताना, लगतच्या ऊसाच्या शेतात सुरेश अहिरे यांचा एक अवयव आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि ग्रामस्थांच्या पायाखालची जमीन सरकली.
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच आमदार विठ्ठलराव लंघे, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, वन अधिकारी अविनाश तेलोरे तसेच महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आमदार लंघे यांनी परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाला आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच, त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून तालुक्यातील वाढत्या बिबट्यांच्या उपद्रवाची माहिती दिली.
गोधेगाव परिसरात यापूर्वी पाळीव कुत्रे, शेळ्या-मेंढ्या यांच्यावर बिबट्याचे हल्ले होत होते. मात्र, आता बिबट्याने माणसाचा बळी घेतल्याने शेतकरी आणि मजुरांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी शेतीची कामे करणे किंवा पाणी भरणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे.
दरम्यान, मुळा, प्रवरा आणि गोदावरी या तिन्ही नद्यांच्या काठालगतच्या गावांमध्ये दिवसाढवळ्या बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. वन विभागाचे या वन्यजीवांवर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही, असा थेट आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. या नरभक्षक बिबट्याला तात्काळ पिंजरा लावून जेरबंद करावे अथवा ठार करावे, अशी आक्रमक मागणी गोधेगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून केली जात आहे. अशी माहिती देखील पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.