तरुणाईच्या विचारांतूनच देशात सामाजिक परिवर्तन शक्य - बाळासाहेब थोरात
◻️ पुण्यात विद्यार्थ्यांशी थेट संवाद; बदलाची वाट न पाहता स्वतः बदलाचा भाग बनण्याचे केले आवाहन
संगमनेर LIVE (पुणे) | तरुणाई ही देशाची खरी ताकद असून, त्यांच्या विचारांतून समाजाला नवी दिशा आणि कृतीतून शाश्वत परिवर्तन घडते. त्यामुळे आजच्या तरुणांनी केवळ बदलाची अपेक्षा न करता स्वतः बदलाचा भाग बनावे,” असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
पुणे येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी बाळासाहेब थोरात यांनी शिक्षण, ग्रामीण विकास, युवा नेतृत्व, पर्यावरण आणि समाजपरिवर्तन अशा विविध पैलूंवर विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या राजकीय व सामाजिक प्रवासातील अनुभव मांडले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “विद्यार्थिदशेत केवळ पदवी शिक्षण घेणे पुरेसे नसून समाजातील घडामोडींचे भान असणे तितकेच आवश्यक आहे. स्वतःला शिस्त लावून सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधणे, हीदेखील राष्ट्रसेवेची महत्त्वाची पायरी आहे. विद्यार्थी चळवळींमधूनच संवेदनशील नेतृत्व घडते आणि समाजाप्रती जाणीव असलेली पिढी निर्माण होते.” असे सांगितले.
आपल्या मंत्रीपदाच्या काळातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी २००९ मधील ‘एक लाख शेततळी’ मोहिमेचा दाखला दिला. जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला कसा मोठा हातभार लागतो, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे विनाअनुदानित महाविद्यालयांचे जाळे उभे राहिले आणि ग्रामीण भागातील सामान्यांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली झाली, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
देशाच्या भविष्याकडे निर्देश करताना थोरात यांनी तरुणाईसमोर एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “आपल्याला जाती-धर्माच्या भिंतींमध्ये अडकलेला देश घडवायचा आहे की समता, बंधुता आणि विज्ञाननिष्ठ विचारांवर चालणारा सक्षम भारत? या प्रश्नाचे उत्तर आजच्या पिढीच्या कृतीतूनच मिळणार आहे. त्यामुळे तरुणांनी शिक्षणाला सामाजिक बांधिलकीची जोड देऊन राष्ट्रउभारणीत सक्रिय योगदान द्यावे.” असे नमूद केले.
दरम्यान, नव्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सामाजिक जाणिवांना हक्काचे व्यासपीठ मिळते. योग्य संधी आणि मार्गदर्शन लाभल्यास आजची तरुणाई देशात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकते, असा ठाम विश्वास देखील व्यक्त केला.