प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा सेवा करणारे हात अधिक पवित्र - पद्मभूषण डॉ. नोरी
◻️पद्मश्री डॉ. विखे पाटील विद्यापीठाच्या पहिल्या बॅचचा दीक्षारंभ सोहळा
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “आजचे वैद्यकशास्त्र केवळ रुग्णालयांपुरते मर्यादित राहिलेले नसून कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) आणि विविध विद्याशाखांच्या संगमाने ते विस्तारत आहे. मात्र, वैद्यकशास्त्राच्या केंद्रस्थानी एक आध्यात्मिक सेवाभाव दडलेला आहे, हे कधीही विसरू नका. प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा सेवा करणारे हात अधिक पवित्र असतात. प्रत्येक रुग्णाची सेवा ही मानवी रूपातील ईश्वराचीच सेवा आहे,” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कर्करोगतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. दत्तात्रेयुडू नोरी यांनी दिला.
पद्मश्री डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या २३ व्या तुकडीच्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ‘लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठा'च्या पहिल्या तुकडीच्या स्वागत समारंभात (इंडक्शन प्रोग्राम) ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा संगम आवश्यक
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. नोरी म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्र हा अत्यंत उदात्त व्यवसाय आहे. आजचे वैद्यकीय शिक्षण हे संगणक, जैवतंत्रज्ञान आणि मानवी करुणा यांचा संगम बनले आहे. भविष्यात कृत्रिम बुध्दिमत्ता आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारे रुग्णाची जीवनशैली, जैविक गुणधर्म व आर्थिक परिस्थितीनुसार अचूक उपचार करणे शक्य होणार आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना रुग्णांची जीवनकहाणी विसरू नका. प्रत्येक वैद्यकीय अहवालामागे एक कुटुंब आणि माणसाचे आयुष्य दडलेले असते. त्यामुळे भावी डॉक्टरांनी विज्ञानासोबतच सहानुभूती व नैतिक मूल्ये जपली पाहिजेत.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री तथा फाउंडेशनचे अध्यक्ष नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “राज्यातील पहिल्या खासगी ग्रामीण विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो. वैद्यकीय महाविद्यालयाचा २३ वर्षांचा प्रवास आणि विद्यापीठाची स्थापना हे स्वप्नपूर्तीचे क्षण आहेत. या महाविद्यालयात प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी आमच्या कुटुंबाचा भाग असून त्यांचे पालकत्व आम्ही स्वीकारले आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच विशेष हेल्पलाइन सुरू केली जाईल.” तसेच डॉ. नोरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यापीठ देशात अग्रस्थानी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“मी जगभरातील विविध संस्थांशी जोडलेला असलो तरी माझे मन नेहमी भारताशी घट्ट जोडलेले राहिले आहे. शिर्डीच्या साईबाबांवरील श्रध्दा हा माझा नैतिक मार्गदर्शक आणि आंतरिक शक्तीचा स्रोत आहे. निःस्वार्थ सेवा, नम्रता आणि मानवाप्रती प्रेम या त्रिसूत्रीने मला वैद्यकीय प्रवासात नेहमीच मार्ग दाखवला आहे.” असे आंतरराष्ट्रीय कर्करोगतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. दत्तात्रेयुडू नोरी यांनी नमूद केले.
दरम्यान, या सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. विष्णू मगरे यांच्यासह वसंतराव कापरे, नंदकुमार झावरे, उत्तमराव कदम, सुभाष पाटील, सुभाष भदगले, विनायक देशमुख, डॉ. अभिजित दिवटे, डॉ. पांडुरंग गायकवाड आदी मान्यवर व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.