संगमनेर तालुक्यात उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ‘दिवाळी शिधा’ वाटप होणार
◻️आमदार अमोल खताळ यांचे टॅकर, चारा आणि अपूर्ण पाणी योजना मार्गी लावण्याचे प्रशासनाला निर्देश
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व गरजू कुटुंबांची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विशेष ‘दिवाळी शिधा' उपलब्ध करून देण्यात आला आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांतील गरजू कुटुंबांपर्यंत हा शिधा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमार्फत लवकरच पोहोचवला जाईल, अशी घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली.
जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार खताळ यांनी तालुक्यातील टंचाई, पाणीपुरवठा, पशुधनाचा चारा आणि रोजगार हमी योजनांबाबत प्रशासकीय उपाययोजनांची माहिती दिली.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आमदार खताळ म्हणाले, “पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावांमध्ये आवश्यकतेनुसार टॅकर सुरू करण्यात आले आहेत. कोणत्याही गावातून टॅकरची मागणी आल्यास प्रशासनाने कसलीही दिरंगाई न करता तत्काळ पाणीपुरवठा सुरू करावा, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. येत्या काळात टंचाई वाढण्याची शक्यता गृहीत धरून उपलब्ध पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे.”
केवळ टॅकरवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर शाश्वत जलस्रोत बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगत ते म्हणाले, “तालुक्यातील ‘जलजीवन मिशन’सह इतर पाणीपुरवठा योजनांची ७५ ते ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे निधीअभावी रखडू नयेत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. ही कामे मार्गी लागल्यास ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. याशिवाय विहिरींचे खोलीकरण आणि नादुरुस्त पाइपलाइन दुरुस्तीची कामेही हाती घेतली जात आहेत.”
शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या चाऱ्याच्या संकटावर बोलताना आमदार खताळ म्हणाले, “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तरतुदींना मान्यता दिली आहे. दुष्काळात जनावरांचे हाल होऊ नयेत व शेतकऱ्यांवर आर्थिक ताण पडू नये, यासाठी पशुसंवर्धन व महसूल विभागाशी समन्वय साधून चारा-पाण्याची चोख व्यवस्था केली जात आहे.” असे नमूद केले.