“राजकीय मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही; शेतकरीहितासाठी एकत्र या!”

संगमनेर Live
0
“राजकीय मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही; शेतकरीहितासाठी एकत्र या!”

◻️ जिल्हा बॅक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटलांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “राजकारणात आरोप-प्रत्यारोप, वैचारिक मतभेद आणि निवडणुकीतील चुरस हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचे योग्य नियोजन आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास या मुद्द्यांवर राजकीय सीमा ओलांडून सर्व पक्षांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. आमचे राजकीय मतभेद असू शकतात, पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही; शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व एक आहोत," अशी भूमिका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडली.

​नवरात्री घटस्थापनेच्या मुहूर्तावर राजूर (ता. अकोले) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांना उद्देशून त्यांनी विकासाच्या अजेंड्यावर सहकार्याचे आवाहन केले.

​आपल्या भाषणात तालुक्यातील शेती आणि सिंचनाच्या मुद्द्यांवर भर देताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “अकोले तालुक्यातील पाणीप्रश्न, शेती आणि बळीराजाच्या अडचणींवर मात करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद हवा. शेतकरी अडचणीत असताना राजकारण बाजूला ठेवून त्यांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. केवळ निवडणुकीपुरती स्पर्धा ठीक आहे, मात्र सार्वजनिक हिताच्या विषयांवर परस्पर सहकार्याची भूमिकाच तालुक्याला पुढे नेऊ शकते.”

​जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत अकोले तालुक्यातून विविध प्रवर्गांतून मोठ्या प्रमाणावर दाखल झालेल्या अर्जांचा संदर्भ देत डॉ. विखे पाटील यांनी मिश्कील शैलीत तालुक्याच्या राजकीय जागरूकतेचे कौतुक केले. “अकोल्यात येताना राजकीय वातावरणाची थोडी धास्ती वाटत होती, मात्र एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज येणे हे सहकार क्षेत्रातील सजगतेचे लक्षण आहे. अकोल्याला समृध्द वैचारिक परंपरा लाभली असून, लोकप्रतिनिधींनी तालुक्याच्या विकासासाठी एकदिलाने काम केल्यास तालुक्याचा कायापालट वेगाने होईल,” असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

​स्वर्गीय पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या काळापासून विखे पाटील परिवाराचे अकोले तालुक्याशी घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे ऋणानुबंध राहिले आहेत, याचे स्मरण करत त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “राजकारणात परस्परांचा सन्मान राखत संवादाची परंपरा कायम राहिली पाहिजे; मतभेदांमुळे वैयक्तिक संबंधांत कटुता येता कामा नये," असेही ते म्हणाले.

दरम्यान, ​या कार्यक्रमास आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, सीताराम गायकर, मधुकर नवले, कैलास वाकचौरे यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !