निळवंडे उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा!
◻️ कृती समिती व शेतकऱ्यांची पालकमंत्री विखे पाटलांकडे मागणी
संगमनेर LIVE (अनिल शेळके)| ऑक्टोबर महिन्यातील तीव्र उन्हामुळे संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा भीषण प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातील उभी पिके व पशुधन वाचवण्यासाठी निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याला नोव्हेंबर महिन्यातच तातडीने पाणी आवर्तन (रोटेशन) देण्यात यावे, अशी आग्रही मागणी ‘निळवंडे धरण उजवा कालवा कृती समिती’चे अध्यक्ष भारत गीते यांनी शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे.
यासंदर्भात भारत गिते हे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना लेखी निवेदन देखील देणार आहेत.
दिवाळीपूर्वीपासूनच पूर्व भागात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली आहे. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व गुरांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे. नोव्हेंबरमध्ये जर कालव्यातून पाणी सोडले, तर विहिरी-तलाव भरल्यानंतर चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल आणि शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची पेरणी करणे सोपे जाईल, असा विश्वास शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निळवंडे कालवा पाणी वाटप बैठकीमध्ये डिसेंबर आणि जानेवारी-फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत सिंचनाचे आवर्तन देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र, डिसेंबरपर्यंत वाट पाहिल्यास खरीप-रब्बीचा चारा जळून जाईल आणि जनावरांचे हाल होतील. त्यामुळे प्रशासनाने पूर्व भागातील वस्तुस्थितीचा सकारात्मक विचार करून नियोजित वेळेआधीच, म्हणजेच नोव्हेंबरमध्येच पाणी आवर्तन जाहीर करावे, अशी बळीराजाची मागणी आहे.
दरम्यान, या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि मागणीचा तात्काळ पाठपुरावा करण्यासाठी निळवंडे कालवा लाभधारक शेतकरी आणि पंचक्रोशीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष भारत गीते यांनी दिली आहे.