‘आधी गॅस भरा, पैसे नंतर द्या!’; भारत गॅसची ग्राहकांसाठी भन्नाट योजना!
◻️ सिलिंडर खरेदीसाठी ६०० रुपयांपर्यंत लहान कर्ज सुविधा
◻️ दर आठवड्याला १०० रुपयांच्या सुलभ हप्त्याने परतफेड
संगमनेर LIVE (नवी दिल्ली) | महिन्याच्या मध्यात अचानक घरातील स्वयंपाकाचा एलपीजी सिलिंडर संपल्यास आणि हातात पुरेसे पैसे नसल्यास सर्वसामान्य व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांचे घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडते. अशा आणीबाणीच्या वेळी ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी 'भारत गॅस'ने एका विशेष योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार ग्राहकांना सिलिंडर रिफिल करण्यासाठी ६०० रुपयांपर्यंतचे मायक्रो-लोन (अल्प कर्ज) उपलब्ध करून दिले जाणार असून, या कर्जावर शून्य टक्के व्याज आकारले जाईल.
ही संपूर्ण सुविधा ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ या आधुनिक आर्थिक संकल्पनेवर आधारलेली आहे. त्यामुळे ऐनवेळी खिशात पैसे नसले तरी ग्राहकांचे स्वयंपाकघर बंद पडणार नाही. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकाकडून कोणतेही अतिरिक्त छुपे शुल्क किंवा व्याज घेतले जाणार नाही; ग्राहकाला केवळ मूळ ६०० रुपयेच परत करावे लागतील.
एकाच वेळी संपूर्ण रक्कम भरण्याचा ताण येऊ नये म्हणून साप्ताहिक हप्त्यांचा सुलभ पर्याय देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, ६०० रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर ग्राहकाला पुढील सहा आठवड्यांत दर आठवड्याला १०० रुपये याप्रमाणे सहज परतफेड करता येणार आहे. दैनंदिन मजुरी किंवा अल्प उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांसाठी हा हप्त्यांचा पर्याय अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे.
दरम्यान, भारत गॅसने ही सूक्ष्म-कर्ज योजना सध्या देशातील काही ठरावीक भागांमध्ये प्रायोगिक (पायलट) तत्त्वावर सुरू केली आहे. देशभरातील सर्व शहरांत ही योजना कधी पूर्णपणे लागू होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर, बनावट मेसेज किंवा सायबर फसवणुकीला बळी न पडता, योजनेची अधिकृत पात्रता, कागदपत्रे आणि स्थानिक उपलब्धतेची माहिती थेट आपल्या नजीकच्या भारत गॅस वितरकाशी संपर्क साधूनच घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.