शेतकरी प्रमाणपत्रांमुळे महिलांच्या कष्टाला अधिकृत ओळख - मंत्री विखे पाटील
◻️ पालकमंत्र्यांच्या हस्ते राहत्यात ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ वाटप
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | ग्रामीण भागातील महिलांच्या शेतीतील सक्रिय सहभागाची दखल घेत त्यांच्या कष्टाला अधिकृत ओळख आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढून शेती क्षेत्रात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहाता येथे आयोजित विशेष कार्यक्रमात महिला सक्षमीकरण विधेयकाच्या अनुषंगाने ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ वाटप मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या मोहिमेअंतर्गत एकट्या राहाता तालुक्यातून तब्बल २० हजार महिला शेतकऱ्यांनी प्रमाणपत्रासाठी नोंदणी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना नामदार विखे पाटील म्हणाले, “शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचे योगदान अनमोल असते. मात्र, बऱ्याचदा त्यांच्या श्रमाला अधिकृत मान्यता मिळत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठीच शासनाने महिलांना स्वतंत्र ओळख देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रमाणपत्रांमुळे शासकीय कृषी योजनांचा थेट लाभ महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अधिक सुलभ होणार असून त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण साध्य होईल.”
दरम्यान, या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड आणि तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांच्यासह कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.