भोजापूर चारीच्या पाण्यासाठी दिवाळीपूर्वी जलसंपदामंत्र्यांसोबत बैठक
◻️आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते तळेगाव दिघे येथे शिवसेना शाखेचे उध्दघाटन
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | भोजापूर चारीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दिवाळीपूर्वी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत भोजापूर कृती समितीच्या प्रतिनिधींची विशेष बैठक आयोजित करण्यात येईल. स्थानिक शेतकऱ्यांच्या आणि कृती समितीच्या सूचना ऐकून घेऊन योग्य तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
तळेगाव दिघे (ता. संगमनेर) येथे शिवसेना शाखेचे उध्दघाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्या भाषणात आमदार खताळ म्हणाले, “भोजापूर चारीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्यावर आजवर केवळ राजकारण झाले. प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यात अनेक अडचणी होत्या. मागील वर्षी चांगल्या पावसामुळे आपण चारीतून सुमारे ७२ दिवस पाणी सुरू ठेवू शकलो; मात्र यंदा पावसाअभावी परिस्थिती आव्हानात्मक आहे. या कामासाठी यापूर्वी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला, तरी चारीचे रुंदीकरण व इतर सुधारणांबाबत स्थानिकांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत. यासंदर्भात संबंधित विभागाला पत्र दिले असून शेतकरी हितासाठी शासनस्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.”
तसेच नदीजोड प्रकल्पात सुरुवातीला केवळ सिन्नर तालुक्यातील गावांचा समावेश होता, संगमनेरचा नव्हता. मात्र, आमदार झाल्यानंतर केलेल्या पाठपुराव्यामुळे भोजापूर परिसरातील गावांचाही यात समावेश करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून भविष्यात दुष्काळातही शेतकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासकीय कामकाजावर बोलताना आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला. “शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि महिलांची कामे विनाकारण प्रलंबित ठेवू नयेत. जनतेची कामे अडवणूक करणाऱ्या किंवा कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही; त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
गेल्या दोन वर्षांत तळेगाव आणि परिसरातील विविध विकासकामांसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून सुमारे साडेसात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तळेगाव येथील बिरोबा महाराज मंदिराच्या उर्वरित विकासकामांसाठी पर्यटनमंत्र्यांशी चर्चा करून निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शिवसेना हा केवळ पक्ष नसून एक कुटुंब आहे, आणि आपण आमदार असलो तरी जनतेचे एक सामान्य कार्यकर्ते म्हणूनच सदैव उपलब्ध राहू, असेही ते म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमास यावेळी विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, मयूर दिघे, डॉ. संतोष डांगे, पंढरीनाथ इल्हे, मच्छिंद्र दिघे, नामदेव दिघे, एकनाथ मुंगसे, बाळासाहेब दिघे, संपत फड, गणेश दिघे, गणेश बोडखे, शिवाजी दिघे, संजय कवाडे, संजय कदम, उत्तम दिघे, दत्तात्रय दिघे, राजेंद्र दिघे, संतोष दिघे, विनायक कांदळकर, प्रकाश दिघे, संकेत गुंजाळ, संजय दिघे, किरण दिघे, बाळासाहेब दिघे, राजेंद्र दिघे, निलेश दिघे, चांगदेव कांदळकर, राजेश दिघे, गोरख इल्हे यांच्यासह तळेगाव परिसरातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.