पानोडी शिवारातील धाडसी चोरीत साडेचार लाखांचा ऐवज लंपास!
◻️ अडीच लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांने पळवले
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | पानोडी शिवारात गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका घरावर डल्ला मारत रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा तब्बल साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पानोडी (ता. संगमनेर) शिवारात राहणारे नवनाथ कारभारी पाबळ यांच्या घरी गुरुवारी (दि. ८) मध्यरात्री ही धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी घराच्या देवघराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर स्वयंपाकघरातील लोखंडी कपाट उचकटून त्यामध्ये ठेवलेली २ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि तीन तोळ्यांचे गंठन, अंगठी, कानातले वेल, पोत असे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
ही घटना लक्षात आल्यानंतर सकाळी पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तपासाच्या अनुषंगाने पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
दरम्यान, याप्रकरणी नवनाथ पाबळ यांच्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर २१२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.