संगमनेरमधील वीजप्रश्नांवर आमदार अमोल खताळांचे ऊर्जा राज्यमंत्र्यांना निवेदन
◻️कृषीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची व नादुरुस्त रोहित्र बदलण्याची आग्रही मागणी
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्या तात्काळ सोडवण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी मंत्रालयात ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी तालुक्यातील प्रलंबित वीजप्रश्नांकडे राज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असून, मेंढवन येथील मंजूर वीज उपकेंद्राचे काम विनाविलंब सुरू करावे, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली.
संगमनेर तालुक्यातील अनेक गावे, वाड्या आणि वस्त्यांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातच शेतीच्या हंगामात कृषीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने विस्कळीत होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे शेतकऱ्यांना कठीण बनले आहे. याशिवाय विविध भागांत वीज रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) वारंवार नादुरुस्त होणे, जळालेले अथवा खराब रोहित्र वेळेवर बदलून न मिळणे आणि नवीन रोहित्र उपलब्ध नसणे यांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या सर्व अडचणींचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होत असल्याने महावितरणने तालुक्यातील वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम आणि कार्यक्षम करावी, अशी आग्रही भूमिका आमदार खताळ यांनी राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या निदर्शनास आणून दिली.
दरम्यान, संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे मंजूर असलेले वीज उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित झाल्यास परिसरातील अनेक गावांवरील वीजपुरवठ्याचा ताण कमी होणार आहे. त्यामुळे या उपकेंद्राचे प्रत्यक्ष काम विनाविलंब हाती घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार खताळ यांनी केली. शेतकऱ्यांच्या शेतीकामात विजेअभावी कोणताही अडथळा येऊ नये आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने ठोस उपाययोजना कराव्यात, यावर त्यांनी भर दिला.
तसेच, संगमनेर मतदारसंघातील ग्रामीण भागातील वीजपुरवठ्यात प्रत्यक्ष सुधारणा होऊन शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.