श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासन भाविकांच्या सुरक्षेसाठी सज्ज!

संगमनेर Live
0
श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासन भाविकांच्या सुरक्षेसाठी सज्ज!

◻️​ शारदीय नवरात्रोत्सवातील गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर आपत्कालीन मदतीचे प्रात्यक्षिक


संगमनेर LIVE (​तुळजापूर) | महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीचा आगामी शारदीय नवरात्र महोत्सव ११ ऑक्टोबरपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. या महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर प्रशासनाने भाविकांच्या आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांपैकी कोणाचीही अचानक प्रकृती बिघडल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीतील तळमजल्यावर सर्व सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना आपत्कालीन प्रथमोपचार तसेच ‘सीपीआर'चे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

​शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात देशभरातून लाखो भाविक तुळजापुरात दाखल होतात. अशा अथांग गर्दीच्या वेळी उकाडा, थकवा किंवा हृदयविकारामुळे एखादा भाविक अचानक बेशुध्द पडल्यास अथवा त्याचा श्‍वास थांबल्यास पहिल्या काही महत्त्वाच्या मिनिटांत त्याचे प्राण कसे वाचवावेत, याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

​यावेळी डॉ. श्रीराम नरवडे आणि डॉ. विकास क्षीरसागर यांनी कर्मचाऱ्यांना अत्यंत सोप्या भाषेत ‘मूलभूत जीवन आधार’ तंत्राचे प्रात्यक्षिकासह धडे दिले. एखादी व्यक्ती अचानक कोसळल्यास सर्वप्रथम तिची नाडी आणि श्‍वासोच्छवास तपासून प्राथमिक स्थिती कशी ओळखावी, श्‍वास बंद पडल्यास छातीवर अचूक गतीने दाब देऊन ‘सीपीआर' कसा सुरू करावा, तसेच रुग्णवाहिका किंवा डॉक्टरांची मदत मिळेपर्यंतच्या अत्यंत नाजूक क्षणांत कृत्रिम श्‍वास कसा द्यावा, याबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष सराव करून घेतला. चेंगराचेंगरी किंवा अतिगर्दीत ऑक्सिजनअभावी गुदमरणाऱ्या भाविकांवर तातडीने कोणते प्रथमोपचार करावेत, याचे बारकावेही यावेळी समजावून सांगण्यात आले.

​मंदिरात कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास सर्वप्रथम मदतीसाठी सुरक्षा रक्षक किंवा स्वच्छता कर्मचारीच त्या ठिकाणी हजर असतात. त्यामुळे त्यांनाच हे जीवनरक्षक कौशल्य अवगत असल्यास संभाव्य अनर्थ आणि जीवितहानी वेळेत टाळता येणे शक्य होणार आहे. मंदिर प्रशासनाच्या या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाचे भाविक आणि स्थानिक नागरिकांमधून कौतुक होत आहे.

दरम्यान, ​या प्रशिक्षण वर्गास सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, ऋषिकेश पराडे, सहायक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार, ओम खुरुद, स्वच्छता निरीक्षक दयानंद जोगदंड, सुरक्षा पर्यवेक्षक अक्षय घुगे, अनिल लोखंडे, आनंद पाटील, राजेंद्र नरवडे, स्वप्नील इंडोरी यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !