पुणे-नाशिक महामार्गावर वारकऱ्यांना चिरडणाऱ्या कंटेनर चालकाला सश्रम कारावास!
◻️तीन वर्षांपूर्वी झालेल्या अपघात चार वारकऱ्यांचा झाला होता मृत्यू
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खंदरमाळवाडी शिवारात पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवून चार निष्पाप वारकऱ्यांचा बळी घेणाऱ्या आणि पालखी रथाला जोरदार धडक देणाऱ्या बेदरकार कंटेनर चालकाला संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने विविध कलमांखाली दोषी ठरवत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. छोटेलाल आलगू पाल असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपी चालकाचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक २ चे न्यायाधीश एम. आर. नेरलेकर यांनी फिर्यादी, साक्षीदार, पंच आणि तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंदरमाळवाडी शिवारात (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) भाविकांची दिंडी चालली होती. त्यावेळी आरोपी छोटेलाल पाल याने आपल्या ताब्यातील कंटेनर निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना थेट चिरडले. त्यानंतर हा कंटेनर थेट पालखी रथावर जाऊन आदळला. या भीषण दुर्घटनेत चार वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर १५ ते १६ वारकरी गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाला सतर्क ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले आणि घारगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा रजि. क्र. ५४२/२०२३ दाखल करण्यात आला होता.
न्यायालयात खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश एम. आर. नेरलेकर यांनी आरोपी छोटेलाल पाल याला कलम २३५(२) अन्वये विविध कलमांखाली शिक्षा ठोठावली. यामध्ये भारतीय दंड विधान कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास, कलम ३३८ (गंभीर दुखापत पोहोचवणे) अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास, कलम ३३७ (दुखापत पोहोचवणे) अंतर्गत ८ महिने सश्रम कारावास आणि कलम २७९ (निष्काळजीपणे वाहन चालवणे) अंतर्गत ४ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. याव्यतिरिक्त मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये २ महिने साधा कारावास आणि कलम १३४(अ)(ब)/१८७ अन्वये २ महिने साधा कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या सर्व शिक्षा आरोपीला एकत्रितपणे भोगायच्या आहेत.
सदर गुन्ह्याचा सखोल व गतिमान तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी केला होता. त्यांनी घटनास्थळावरून वैज्ञानिक पुरावे, साक्षीदार आणि तांत्रिक बाबी अत्यंत चिकाटीने संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते. खटल्यादरम्यान अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती डॉ. रेश्मा युवराज जाधव यांनी सरकार पक्षातर्फे अत्यंत प्रभावी युक्तिवाद करून आरोपीचा गुन्हा सिध्द करण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे आणि सहाय्यक फौजदार सुरेश टकले यांनी खटल्याच्या सुनावणीदरम्यान साक्षीदारांना वेळेवर न्यायालयात हजर करणे व न्यायालयीन पाठपुरावा करण्याचे काम चोख पार पाडले.
दरम्यान, अपघातातील पीडित वारकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चोख तपास आणि प्रभावी न्यायालयीन कामकाज केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी तपास अधिकारी, सरकारी वकील व पोलीस अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.