कोल्हापूर येथे श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी!

संगमनेर Live
0
कोल्हापूर येथे श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी!

◻️ मंदिराचा गाभारा लखलखला; ऐतिहासिक हिरे-माणिक-पाचूच्या अलंकारांना झळाळी!


संगमनेर LIVE (​कोल्हापूर) | साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आगामी शारदीय नवरात्रौत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या लोकोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण मंदिर परिसर चैतन्यमय झाला असून, मंदिराच्या बाह्य परिसरापासून ते मुख्य गाभाऱ्यापर्यंत स्वच्छता, रंगरंगोटी आणि सुरक्षेची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत.

​सोमवारी सकाळी रोषणनाईक व चोपदारांच्या उपस्थितीत श्रीपूजकांच्या हस्ते विधिवत पूजन करून उत्सवमूर्ती गर्भागारातून बाहेर आणण्यात आली व महासरस्वतीजवळ विराजमान करण्यात आली. यामुळे गाभारा स्वच्छतेदरम्यानही भाविकांना दिवसभर उत्सवमूर्तीचे दर्शन घेणे सुलभ झाले. दरम्यान, गाभाऱ्याच्या स्वच्छतेच्या वेळी परंपरेनुसार भात लावणीच्या वेळी वापरले जाणारे पारंपरिक ‘इरलं’ अंबाबाईच्या मूळ पाषाणमूर्तीवर पांघरून तिचे पाण्यापासून संरक्षण करण्यात आले. त्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून वॉटरगनच्या साहाय्याने मुख्य गाभारा, कासव चौक, गणपती चौक आणि पेटी चौक स्वच्छ धुऊन काढण्यात आले. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत गाभारा पूर्णपणे लखलखीत झाल्यानंतर मूळ मूर्तीवरील इरलं हटवून गाभारा पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला.

​नवरात्रौत्सवात देवीच्या पूजेसाठी आणि पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व मौल्यवान साहित्याची कडक सुरक्षा व्यवस्थेत स्वच्छता करण्यात आली आहे. यामध्ये चांदीची पालखी, भव्य सिंहासन, चौरंग, कटांजन, धुपारती, अब्दागिरी, प्रभावळ, पूजेचा गणपती, समई, निरांजने आणि तबक या सर्व पूजेच्या साहित्याला विशेष पॉलिश करून नवी झळाळी देण्यात आली. त्याचबरोबर श्री अंबाबाईच्या खजिन्यातील पेशवेकालीन व ऐतिहासिक हिरे, माणिक, पाचू जडित पारंपरिक अलंकारांचीही तज्ज्ञांच्या देखरेखीखाली स्वच्छता करण्यात आली असून, नित्य व नैमित्तिक पूजेतील सर्व अलंकार नवरात्रातील विविध रूपांतील वैशिष्ट्यपूर्ण पूजांसाठी सज्ज झाले आहेत.

​दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत मंदिराच्या बाह्य परिसराची स्वच्छता पूर्ण करून ओवऱ्यांच्या लाकडी दरवाजांना आकर्षक पॉलिश करण्यात आले आहे. तसेच नवरात्रात देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शनरांगेत पिण्याचे शुध्द पाणी, पंखे आणि उन्हापासून संरक्षणासाठी सावलीची चोख व्यवस्था उभारली जात आहे. याशिवाय महाद्वार, मंदिराची शिखरे आणि संपूर्ण मंदिर परिसरावर केली जाणारी मनमोहक विद्युत रोषणाई अंतिम टप्प्यात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !