गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - आमदार अमोल खताळ
◻️ खराडीत श्री भवानी मातेचा ज्योत सोहळ्यात मंदिरासमोर सभामंडप उभारण्याची ग्वाही
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील ज्या मंदिरांना अद्याप सभामंडप नाही, त्यांना सभामंडप उपलब्ध करून देण्यास आपण प्राधान्य देत आहोत. ग्रामस्थांच्या मागणीचा आदर करत पुढील वर्षापर्यंत खराडी येथील मंदिरासमोर भव्य सभामंडप उभारून दिला जाईल, असा शब्द आमदार अमोल खताळ यांनी दिला. तसेच गावाच्या विकासासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
खराडी येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित श्री भवानी (जगदंबा) मातेच्या भव्य ज्योत सोहळ्यास आमदार अमोल खताळ यांनी पत्नी सौ. नीलम खताळ यांच्यासह उपस्थित राहून मातेचे विधिवत दर्शन घेतले व महाआरती केली. या धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधताना आमदार खताळ म्हणाले की, “गावातील रस्ते असोत अथवा इतर पायाभूत सुविधा, विकासकामांसाठी निधीची अजिबात काळजी करू नका. गेल्या दीड वर्षात प्रत्येक गावाला भरीव निधी दिला असून यापुढेही धार्मिक व सार्वजनिक विकासकामांना आपले पूर्ण सहकार्य राहील. गावकऱ्यांनी विकासाची मागणी करावी, निधी कमी पडू दिला जाणार नाही.”
दरम्यान, गुजरातमधील शक्तिपीठावरून खराडी येथे आणण्यात आलेल्या ज्योतीचे आमदार खताळ यांनी मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर ते भाविकांसह ज्योत मिरवणुकीत सहभागी झाले. यावेळी मातेचा जयघोष आणि पारंपरिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. आमदार खताळ यांच्या उपस्थितीने तरुणाईमध्ये मोठा उत्साह दिसून आला; गावातील तरुणांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा सोहळा उत्साहात पार पडला.