संगमनेरमध्ये ‘आदिशक्ती’कडून मुलांच्या हस्ते घराघरांतील ‘नवदुर्गां’चा सन्मान!
◻️ फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. नीलम खताळ यांचा संवेदनशील पुढाकार
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | आईच्या अथांग कष्टांना जेव्हा मुलांच्या यशाची किनार लाभते, तेव्हा तिच्या संघर्षाचे खऱ्या अर्थाने सार्थक होते. स्वतःच्या आयुष्यात दारिद्र्य आणि संकटे असतानाही मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू नये म्हणून अहोरात्र राबणाऱ्या माता या समाजाच्या खऱ्या ‘नवदुर्गा’ आहेत. अशा प्रसिध्दीच्या झोतात कधीही न आलेल्या, तळागाळातील कर्तृत्ववान मातांचा त्यांच्याच उच्चशिक्षित मुलांच्या हस्ते गौरव करण्याचा अनोखा व भावनिक उपक्रम संगमनेर येथे ‘आदिशक्ती फाउंडेशन’च्या अध्यक्षा सौ. नीलम खताळ यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या विविध रूपांची मंदिरात विधिवत पूजा केली जाते. मात्र, संसाराचा गाडा हाकताना मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या कष्टकरी मातेमधील आदिशक्तीची ओळख समाजाला व्हावी, या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सौ. नीलम खताळ स्वतः अशा नवदुर्गांच्या घरी जाऊन, त्यांच्या उच्चशिक्षित व कर्तृत्ववान मुलांच्या हस्तेच आईला सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करत आहेत. हा सोहळा केवळ एक औपचारिक सत्कार न ठरता, आईच्या त्यागाची जाणीव ठेवणारा आणि कुटुंबातील कृतज्ञतेचा भाव जागवणारा ठरत आहे.
या उपक्रमादरम्यान अनेक प्रेरणादायी मातांच्या संघर्षाला आणि जिद्दीला उजाळा मिळाला आहे. डाळिंबाची रोपे खरेदी करण्यासाठी हातात पैसे नसतानाही निमगाव पागा येथील सौ. ऋतिका कैलास कानवडे यांनी स्वतःचे मंगळसूत्र विकून डाळिंबाची बाग उभी केली. रोपांच्या कमतरतेमुळे आपल्याला जी अडचण आली ती इतर शेतकऱ्यांना येऊ नये, या ध्यासातून त्यांनी पुढे जिद्दीने स्वतःची ‘साई समृध्दी रोपवाटिका’ सुरू केली असून, आज ही रोपवाटिका परिसरात नावारूपास आली आहे.
तर दुसरीकडे, शेती व दुग्ध व्यवसायात सुरुवातीला अपयश आल्यानंतरही खचून न जाता चिखली येथील सौ. गायत्री विकास हासे यांनी नव्या संधीचा शोध घेतला. त्यांनी ‘उमेद’ महिला बचत गटाच्या माध्यमातून ‘गोदाई आटा निर्मिती केंद्र’ सुरू केले असून, महिला शेतकऱ्यांकडून थेट दर्जेदार गहू खरेदी करून तयार केलेल्या या पिठाला आज ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे.
दरम्यान, या दोघींप्रमाणेच संकटांवर मात करत संसाराचा गाडा समर्थपणे ओढणाऱ्या अनेक मातांचा सन्मान या मोहिमेत करण्यात आला. तर, समाजात मोठ्या पदांवर पोहोचलेल्या व्यक्तींच्या यशाचे कौतुक सर्वत्र होते; मात्र त्या यशामागे शेतात राबणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या किंवा संसाराचा गाडा एकहाती ओढणाऱ्या मातेचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहते. या उपक्रमामुळे अशा मातांच्या कष्टांना खऱ्या अर्थाने मानाचा मुजरा मिळाला असून, संगमनेर तालुक्यात या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
“देवीची पूजा मंदिरात नेहमीच होते; परंतु मुलांचे आणि कुटुंबाचे भविष्य घडविण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या आईच्या कष्टांची पूजा तिच्या हक्काच्या घरात व्हावी, हीच या उपक्रमामागील खरी भावना आहे. नवरात्रातील शक्तीच्या उपासनेला सामाजिक संवेदनशीलतेची जोड देत, मुलांच्या यशामागील खऱ्या शिल्पकार असणाऱ्या मातांचा गौरव करणे ही समाज म्हणून आपली जबाबदारी आहे.” असे सौ. नीलम खताळ यांनी बोलताना सांगितले.