५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा; थकीत हप्ते द्या! - डॉ. अजित नवले

संगमनेर Live
0
५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा; थकीत हप्ते द्या! - डॉ. अजित नवले

◻️अन्यथा २६ ला ‘वर्षा’वर धडकणार! ​किसान सभेचा सरकारला इशारा


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रति शेतकरी ५ हजार रुपये अग्रिम मदत देण्याची घोषणा करून राज्य सरकारने केवळ प्रसिध्दीच्या गाजावाजा चालवला असून, ही तुटपुंजी मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा तीव्र संताप अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केला.

प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे संपूर्ण नुकसानभरपाई आणि हक्काचे थकीत अनुदान न दिल्यास येत्या २६ तारखेला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथून हजारो वाहनांचा भव्य ‘लाॅग मार्च’ थेट मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानावर धडकेल, असा निर्वाणीचा इशारा किसान सभेने दिला आहे.

​शासनाच्या या दुटप्पी धोरणावर टीकास्त्र सोडताना ॲड. अजित नवले यांनी नमूद केले की, सरकारने दुष्काळग्रस्तांना अंतिम मदतीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही; केवळ ५ हजार रुपयांच्या अग्रिम मदतीचे श्रेय लाटण्याचा खटाटोप सुरू आहे. मुळात राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हक्काचे दोन हप्ते (प्रति शेतकरी ४ हजार रुपये) शासनाने अद्याप वितरित केलेले नसून ही थकीत रक्कम तब्बल ३ हजार ५९० कोटी रुपयांच्या घरात आहे. 

दुसरीकडे, तांत्रिक त्रुटी आणि केवायसीचे कारण पुढे करून राज्यातील तब्बल ८१ लाख महिलांचे प्रत्येकी १५०० रुपयांप्रमाणे १ हजार २१५ कोटी रुपयांपेक्षा अधिकचे अनुदान शासनाने अडवून ठेवले आहे. स्वतःच्या हक्काचे हजारो कोटी रुपये थकवायचे आणि अवघ्या ५ हजार रुपयांची मदत देऊन उपकार केल्याचा आव आणायचा, हा सरकारचा निव्वळ बनाव असल्याचा आरोप देखील आहे.

​त्याचप्रमाणे, सध्याच्या एनडीआरएफच्या अपुऱ्या निकषांनुसार मिळणाऱ्या रकमेतून केवळ बियाणे व खतांचा खर्च निघू शकतो; त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष पिकांचे झालेले अतोनात नुकसान पाहता ही मदत अत्यंत तोकडी ठरते. यासाठी पीक विम्यातील संरक्षित रकमेचा विचार करून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात संपूर्ण भरपाई देण्यात यावी, तसेच बॅकांचे कर्ज काढून प्रामाणिकपणे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक दिलासा मिळावा, अशी आग्रही मागणी किसान सभेने लावून धरली आहे.

दरम्यान, ​केवळ पोकळ घोषणा करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी किसान सभेने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. शासनाने तात्काळ सर्व प्रलंबित हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत आणि सर्वंकष दुष्काळ भरपाई जाहीर करावी; अन्यथा येत्या २६ तारखेला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून हजारो वाहनांचा विराट ‘लाॅग मार्च’ थेट मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर धडकेल, असा स्पष्ट इशारा किसान सभेच्या वतीने डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !