पालकमंत्र्यासह आमदार खताळांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात!
◻️ मिर्झापूर-धांदरफळ रस्ता आणि चंदनापुरी-शिरापूर पुलाचे कामांचा शुभारंभ
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी महत्त्वाच्या विकासकामांना गती मिळाली आहे. संगमनेर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द रस्ता आणि चंदनापुरी ते शिरापूर दरम्यानच्या पुलाच्या कामासाठी शासनाकडून तब्बल ९ कोटी ८४ लाख ३६ हजार रुपयांचा एकत्रित निधी मंजूर करण्यात आला आहे.
या दोन्ही विकासकामांच्या भूमिपूजनानंतर आता प्रत्यक्ष कामाला जोमाने सुरुवात झाली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्थानिक आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले होते.
या विकासकामांमध्ये मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ६ कोटी ५९ लाख ६६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता स्थानिक ग्रामस्थ, नोकरदार आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्याचे काम दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण झाल्यास परिसरातील भाजीपाला, दूध व इतर शेतमालाची वाहतूक बाजारपेठेत विनाविलंब पोहोचण्यास मोठी मदत होणार असून, नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळ वाचवणारा ठरणार आहे.
दुसऱ्या बाजूला, चंदनापुरी ते शिरापूर दरम्यानच्या पुलाच्या बांधकामासाठी ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाणी वाढल्यामुळे या भागात संपर्क तुटणे अथवा वाहतुकीची मोठी कोंडी होण्याच्या समस्या वारंवार निर्माण होत होत्या.
या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यातील या संभाव्य अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असून चंदनापुरी व शिरापूर परिसरातील नागरिक, शेतकरी आणि वाहनधारकांसाठी एक सुरक्षित व सोयीस्कर मार्ग उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, दोन्ही विकासकामे विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत परिसरातील नागरिकांनी या कामांच्या सुरुवातीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.