श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवासाठी शिर्डी संस्थान सज्ज

संगमनेर Live
0
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवासाठी शिर्डी संस्थान सज्ज

◻️​१९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संत श्री साईबाबा यांच्या १०८ व्या पुण्यतिथी उत्सवाची जय्यत तयारी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने पूर्ण झाली आहे. सोमवार, दि. १९ ऑक्टोबर ते बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत हा उत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा होणार आहे. देश-विदेशातील लाखो साईभक्तांनी या मंगल सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे. 

या उत्सवासाठी संस्थानने देश-विदेशातील सुमारे १ लाख ६६ हजार सभासदांना निमंत्रण पत्रिका तर १ लाख ९९ हजार देणगीदारांना ई-मेलद्वारे आदरपूर्वक निमंत्रित केले आहे. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे, समाधी मंदिरावरील सुवर्ण कळसाला ७४ वर्षे पूर्ण होऊन ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत असल्याने मंगळवारी विशेष सुवर्ण कलशारोहण अमृत महोत्सव सोहळा दिमाखात पार पडणार आहे.

​पुण्यतिथी उत्सवानिमित्त गुजरात येथील दानशूर साईभक्त सौ. ममता सतीश कपिलेश्‍वरकर यांच्या देणगीतून संपूर्ण मंदिर परिसर मनमोहक फुलांनी सजविण्यात येत आहे. तसेच मुंबई-शिर्डीच्या ‘साई द्वारकामाई मंडळा’तर्फे विलोभनीय विद्युत रोषणाई आणि गेट क्र. ४ जवळ भव्य असा ‘साईद्वारकाधीश देखावा’ उभारण्यात येत आहे.

भाविकांच्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी मंदिर परिसर, चावडी, मारुती मंदिर, पालखी मार्ग, साई उद्यान आणि नवीन प्रसादालय परिसरात मिळून तब्बल ९४ हजार चौरस फुटांचे विशाल मंडप उभारण्यात आले आहेत. यासोबतच संस्थानच्या विविध भक्तनिवासांतून सुमारे २३ हजार भाविकांच्या कायमस्वरूपी व तात्पुरत्या निवासाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

​उत्सवादरम्यान भाविकांच्या खानपानाची व आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. प्रसादालयात तिन्ही दिवशी अनुक्रमे गुलाबजाम, खीर आणि बालुशाही या मिष्टान्नाचे वाटप केले जाईल. याशिवाय १७० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद तयार करण्यात येत असून, भाविकांना सहज खरेदी करता यावेत यासाठी विविध ८ ठिकाणी विशेष विक्री केंद्रे सुरू राहणार आहेत.

दर्शनरांगेत चहा, कॉफी व दुधाची सोय करण्यात आली असून, तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी मंदिर परिसर आणि निवासस्थानांजवळ ८ प्रथमोपचार केंद्रे तसेच २४ तास रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

​धार्मिक कार्यक्रमांच्या रूपरेषेनुसार, उत्सवाच्या प्रथम दिवशी (सोमवार, १९ ऑक्टोबर) पहाटे ५.१५ वाजता काकड आरती, त्यानंतर ग्रंथ व पोथी मिरवणूक आणि द्वारकामाईत 'श्री साईसच्चरित' अखंड पारायणाचा प्रारंभ होईल. अखंड पारायणामुळे सोमवारी रात्री द्वारकामाई रात्रभर खुली राहील आणि रात्री ९.१५ वाजता गावातून श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. 

उत्सवाच्या मुख्य दिवशी (मंगळवार, २० ऑक्टोबर) पहाटे अखंड पारायण समाप्तीनंतर सकाळी ७.३० वाजता ‘सुवर्ण कलशारोहण अमृत महोत्सव' साजरा होईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता पारंपरिक ‘भिक्षा झोळी' कार्यक्रम आणि सायंकाळी ५ वाजता खंडोबा मंदिर येथे ‘सीमोल्लंघन' सोहळा पार पडेल. रात्री ९.१५ वाजता गावातून भव्य रथ मिरवणूक काढली जाईल. मुख्य दिवशी समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असल्याने रात्रीची शेजारती व २१ तारखेची पहाटेची काकड आरती होणार नाही. सांगता दिवशी (बुधवार, २१ ऑक्टोबर) सकाळी ह.भ.प. सौ. राधिका कालेकर (कोल्हापूर) यांचे ‘गोपालकला कीर्तन व दहीहंडी' कार्यक्रम होईल आणि दुपारी १२.१० वाजता माध्यान्ह आरती संपन्न होईल.

​उत्सवकाळात धार्मिक विधींसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी पर्वणी भक्तांसाठी असणार आहे. श्री हनुमान मंदिराशेजारील शताब्दी मंडपात गायक राम शंकर (मुंबई), प्रसिध्द तबलावादक पद्मश्री विजय घाटे यांचा ‘तालचक्र' तसेच राजेश खर्डे यांचा 'परंपरा साईंची' हे भक्ती संगीताचे कार्यक्रम रंगतील. भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण आणि सुलभ दर्शन व्हावे यासाठी उत्सव कालावधीत श्री साईसत्यव्रत (सत्यनारायण) पूजा, अभिषेक पूजा व वाहन पूजा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. 

दरम्यान, हा उत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थानचे तदर्थ समिती अध्यक्ष तथा न्यायाधीश शिवाजी कचरे, सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !