शिरसगाव धुपेतील आदिवासी बांधवांचा शिवसेनेत प्रवेश
◻️आमदारकी मिरवण्यासाठी नाही, तर जनतेच्या सेवेसाठी - आमदार अमोल खताळ
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथील अनेक वर्षांपासून रखडलेले मूलभूत प्रश्न आमदार अमोल खताळ यांच्या कार्यशैलीमुळेच मार्गी लागू शकतात, असा विश्वास व्यक्त करत गावातील आदिवासी बांधव आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना-महायुतीचे आशिष कानवडे आणि भागवत कानवडे यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुजाता धराडे, राजू धराडे आणि निवृत्ती कोरडे यांनी गावातील प्रलंबित समस्यांचा पाढा वाचत त्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. याप्रसंगी गावातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांसह महिलांनी शिवसेनेत प्रवेश करत आमदार खताळ यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला.
प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना आमदार अमोल खताळ म्हणाले, “तालुक्यातील जनतेने एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. ही संधी केवळ पद मिरवण्यासाठी नसून सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आहे. गेल्या चाळीस वर्षांत अनेकांनी स्वतःचा स्वार्थ साधत जनतेच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले. जलजीवन योजनेचा उपयोग नागरिकांची तहान भागवण्याऐवजी ठेकेदारांना पोसण्यासाठीच अधिक झाला, हे दुर्दैवी आहे. मात्र, आमचे सरकार ठेकेदारांचे नव्हे, तर थेट जनतेचे हित जोपासण्यासाठी कटिबध्द आहे.”
शिरसगाव धुपे हे गाव उंचावर वसलेले असल्याने सातगाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी गावात पोहोचण्यात अडचणी येत असून पाणीटंचाई गंभीर बनली आहे. यावर कायमस्वरूपी तांत्रिक तोडगा काढून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, तसेच गावातील रस्ते, वीज यांसारख्या पायाभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही आमदार खताळ यांनी दिली.
शिरसगाव धुपे येथील ग्रामदैवत बिरोबा महाराजांच्या यात्रोत्सवासाठी भाविकांच्या सोयीकरिता सभामंडप उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली. यावर आमदार खताळ यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत, “यंदा शक्य झाले नाही तरी हरकत नाही, परंतु पुढील वर्षीचा बिरोबा महाराजांचा यात्रोत्सव निश्चितपणे भव्य अशा सभामंडपातच साजरा होईल,” असा शब्द ग्रामस्थांना दिला. यामुळे उपस्थित ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले.
दरम्यान, यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुजाता धराडे, पूजा धराडे, राजू धराडे, निवृत्ती कोरडे, अंकुश दिघे, रामनाथ भोजने, संतोष धराडे, संतोष दिघे, नामदेव धराडे, सखाराम दिघे, अमित कोरडे, रामा भुतंबरे, दीपक धराडे, गणेश धराडे, संजय धराडे, जालिंदर धराडे, अर्जुन धराडे, सागर धराडे, सखुबाई धराडे, संगीता दिघे, संगीता कोरडे, चंद्रभागा कोरडे, लहानबाई धराडे, मंगला कोरडे, हिराबाई दिघे, मंदाबाई कोरडे, सोनाबाई धराडे, विजया धराडे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.