राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेत ‘ज्ञानगंगा’ला १४ पदके
◻️मांचीहिल संकुलाची ३ सुवर्ण, २ रौप्य आणि ९ कांस्यपदकांची कमाई
संगमनेर LIVE ( अनिल शेळके) | पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट अजिंक्यपद स्पर्धेत मांचीहिल (ता. संगमनेर) येथील ज्ञानगंगा विद्यानिकेतन या शाळेच्या खेळाडूंनी अष्टपैलू व देदीप्यमान कामगिरीचे प्रदर्शन करत तब्बल १४ पदके पटकावली आहेत.
‘बुडो मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्र’ संलग्न ‘स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून नामांकित खेळाडू सहभागी झाले होते. या चुरशीच्या स्पर्धेत ज्ञानगंगाच्या विद्यार्थ्यांनी विविध वजन व वयोगटांत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत ज्ञानगंगाच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजविले. यामध्ये मयूर खटावकर, प्रेम आरोटे आणि वरद बनसोडे यांनी सर्वोत्कृष्ट तंत्र व खेळाचे प्रदर्शन करत थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच साई क्षीरसागर आणि राज बोढके यांनी चुरशीच्या लढतींमध्ये चमकदार खेळ करत उपविजेतेपदासह रौप्य पदक आपल्या नावे केले. याशिवाय नकुल पवार, निखिलेश खाटीक, यश जाधव, साहिल कोटकर, आर्यन डेरे, दर्शन पावसे, रुद्र एरंडे, रोहन दूधवडे आणि अर्णव मुळे या नऊ खेळाडूंनी आपापल्या गटांत दर्जेदार खेळी करत कांस्यपदक मिळविले. अशा रीतीने ३ सुवर्ण, २ रौप्य आणि ९ कांस्य अशा एकूण १४ पदकांसह शाळेचा संपूर्ण राज्यात मोठा नावलौकिक झाला आहे.
या स्पर्धेचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे ज्ञानगंगा विद्यानिकेतनचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी ओम धरणे. त्याने या राज्यस्तरीय स्पर्धेत अत्यंत कुशलतेने व निष्पक्षपणे ‘पंच’ (रेफरी) म्हणून जबाबदारी पार पाडत क्रीडा रसिकांचे लक्ष वेधून घेतले. एका शाळकरी विद्यार्थ्याने पंच म्हणून दाखविलेल्या अचूकतेचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे.
दरम्यान, या सर्व यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडा प्रशिक्षक रवींद्र बनगैया यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक शाळीग्राम होडगर, संचालिका नीलिमा गुणे, विश्वस्त डॉ. शैलेंद्रसिंह होडगर, डॉ. दिग्विजयसिंह होडगर, प्राचार्य विजय पिसे, उप प्राचार्य गंगाधर चिधें यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.