शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी अकोल्यात ‘महामुक्काम सत्याग्रह’

संगमनेर Live
0
शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी अकोल्यात ‘महामुक्काम सत्याग्रह

◻️ ​तोडगा न निघाल्यास २६ ऑक्टोबरला वाहनांसह ‘मुंबई लॉन्ग मार्च’


संगमनेर LIVE (​अकोले) | शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, दुष्काळ नुकसानभरपाई, कसणाऱ्यांच्या नावावर जमिनी करणे, पीक विम्याची रक्कम आणि ‘लाडकी बहीण’ योजनेतून तांत्रिक कारणास्तव वगळलेल्या ८१ लाख महिलांचा पुनर्विचार, या प्रलंबित मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयासमोर राज्यव्यापी ‘महामुक्काम सत्याग्रह’ सुरू करण्यात आले आहे. 

अखिल भारतीय किसान सभा, सिटू, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि डीवायएफआय यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन उभारण्यात आले असून, शासनाने मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास २६ ऑक्टोबर रोजी २१ जिल्ह्यांतील हजारो शेतकरी ट्रॅक्टर व वाहनांसह थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर धडक देतील, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

​या आंदोलनात शेतकऱ्यांसह कष्टकरी आणि महिलांच्या विविध प्रश्नांवर भर देण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणे, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मंजूर करणे, ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचे थकीत दोन हप्ते जमा करणे आणि पीक विमा योजनेतील सर्व ट्रिगर लागू करून भरपाई देणे या मागण्या लावून धरण्यात आल्या आहेत. 

यासोबतच वनजमीन, गायरान, देवस्थान व घरांच्या तळजमिनी प्रत्यक्ष कसणाऱ्यांच्या नावे करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच केवायसी प्रक्रिया बंद पडल्याने ‘लाडकी बहीण’ योजनेपासून वंचित राहिलेल्या सुमारे ८१ लाख महिलांची प्रक्रिया पुन्हा सुरू करून त्यांना थकीत मानधनासह योजनेचा लाभ द्यावा, असा ठाम आग्रह आंदोलकांनी धरला आहे.

​आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी आणि सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आज, २२ ऑक्टोबर रोजी अकोले येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला माकपच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा करात, पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावित, आमदार विनोद निकोले आणि डॉ. अजित नवले हे प्रमुख नेते संबोधित करणार आहेत. या सभेतून राज्यभरातील शेतकरी व श्रमिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला जाईल.

​“आंदोलने सुरू झाल्यावर शासन केवळ मंत्र्यांची उपसमिती नेमून चर्चा करते आणि तात्पुरती आश्‍वासने देते; परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे' अशी टोलवाटोलवी केली जाते. त्यामुळेच यंदा मंत्र्यांशी वाटाघाटी करण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा' बंगल्यावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे," असा इशारा किसान सभेने दिला आहे.

​२१ ते २६ ऑक्टोबरदरम्यान तहसील कार्यालयासमोर हे ठिय्या आंदोलन सुरू राहणार असून, मागण्या मान्य न झाल्यास २६ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांतील शेतकरी ट्रॅक्टर, पिकअपसह अकोल्यात दाखल होऊन तेथून मुंबईकडे कूच करतील. या लढ्यात शेतकरी, कामगार आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावित, आमदार विनोद निकोले, डॉ. अजित नवले, यशवंत झाडे आणि उमेश देशमुख यांनी केले आहे. 

दरम्यान, हा महामुक्काम सत्याग्रह यशस्वी करण्यासाठी सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, ज्ञानेश्‍वर काकड, ताराचंद विघे, मथुराबाई बर्डे, शिवराम लहामटे, राजू गंभीरे, गणेश ताजणे, एकनाथ मेंगाळ, संगीता साळवे, हेमलता शेळके, सुमन विरणक, काळू मेंगाळ, जुलेखा गोडे आणि कुसुम डोके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सक्रिय आहेत.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !