अवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’वर्ग दर्जा मिळवून देणार - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
अवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’वर्ग दर्जा मिळवून देणार - आमदार अमोल खताळ

◻️ ​लोहारे येथील २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

◻️ विद्यार्थिनींना ५०० सायकली तर महिलांना ५०० शिलाई मशिन्स देण्याची घोषणा


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | लोहारे येथील जागृत व भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री अवजीनाथ बाबा देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रामाणिक पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. देवस्थानच्या नियोजनबध्द विकासासाठी ग्रामस्थ आणि विश्‍वस्तांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

​लोहारे (ता. संगमनेर) येथे अवजीनाथ बाबा यात्रा उत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी बाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी पर्यटन निधीतून पूर्ण झालेल्या २० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

​कार्यक्रमास चंद्रकांत कर्पे, ॲड. गोरक्ष कापकर, भास्कर मुर्तडक, घनश्याम भास्कर, ॲड. शरद काकड, नवनाथ जोंधळे, गणेश वराडे, राहुल आहेर, सुदर्शन पोकळे, राहुल महाराज पोकळे, शरद येलमामे, शरद मुर्तडक, नवनाथ कानकाटे, शंकर रानमाळे यांच्यासह श्री अवजीनाथ बाबा मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, शिवसेना-महायुतीचे कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​उपस्थितांशी संवाद साधताना आमदार खताळ म्हणाले, “सध्या हे देवस्थान ‘क’ वर्गात मोडते. यापूर्वी हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थानाला ‘ब’ वर्ग मिळवून देण्यात यश आले आहे. याच धर्तीवर चालू वर्षात तीन, तर आगामी वर्षात आणखी पाच देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्याचा संकल्प आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध होतो. पर्यटन विभागाच्या २० लाख रुपयांच्या निधीतून कामे झाली असली, तरी कामांचा दर्जा व गुणवत्ता राखणे आवश्यक आहे. देवस्थानच्या विकासात मी ग्रामस्थांना अजिबात निराश होऊ देणार नाही.” असे आश्‍वासन दिले.

​मतदारसंघातील सामाजिक उपक्रमांची माहिती देताना आमदार खताळ यांनी सांगितले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून संगमनेर मतदारसंघातील गरजू विद्यार्थिनींसाठी ५०० सायकली आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ५०० शिलाई मशिन्स उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील मुलींचा शाळेत जाण्या-येण्याचा प्रश्न सुटेल आणि महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी मिळून त्या स्वावलंबी बनतील.”

​दुष्काळ व नैसर्गिक संकटांचा उल्लेख करत आमदार खताळ यांनी सामाजिक बांधिलकीचे आवाहन केले. “अडचणीच्या काळात केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाने शेतकरी कुटुंबांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे. गावातील एखादा शेतकरी संकटात सापडला असल्यास त्याला आधार देऊन पुन्हा उभे करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे आवाहन देखील आमदार अमोल खताळ यांनी केले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !