इंदिरा गांधी व सरदार पटेलांचे देशाच्या एकात्मतेसाठी अद्वितीय योगदान - बाळासाहेब थोरात
◻️अमृत उद्योग समूहाच्या वतीने स्व. इंदिरा गांधी व सरदार पटेल यांना ‘शक्तीस्थळ’ येथे अभिवादन
संगमनेर LIVE | “देशातील ‘गरिबी हटाओ'चा नारा, बॅकांचे राष्ट्रीयीकरण आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती करणारे स्व. इंदिरा गांधी यांचे कणखर नेतृत्व भारताला लाभले. देशाच्या अखंडतेसाठी आणि एकात्मतेसाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली. त्याचप्रमाणे देशातील संस्थानांचे विलीनीकरण करून भारताला एकसंध ठेवण्यात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान ऐतिहासिक आहे,” असे प्रतिपादन काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील ‘शक्तीस्थळ’ येथे अमृत उद्योग समूहाच्या वतीने भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त आणि भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “स्व. इंदिरा गांधी यांनी घेतलेले धाडसी निर्णय आजही देशाच्या विकासाचा पाया ठरले आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर कणखर भूमिका घेत जगाचा नकाशा बदलून दाखवला. देशाची एकात्मता टिकवण्यासाठी त्यांनी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंबही अर्पण केला.” असे नमूद केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव करताना थोरात पुढे म्हणाले, “स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी देशातील सुमारे ४० टक्के भाग विविध संस्थानांमध्ये विभागला गेला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून काम करताना सरदार पटेल यांनी कौशल्याने या सर्व संस्थानांचे भारतात विलीनीकरण केले आणि अखंड भारताचे स्वप्न साकार केले. या थोर राष्ट्रपुरुषांच्या त्यागातून आणि विचारांतून प्रेरणा घेऊन देशाची अखंडता आणि लोकशाही मूल्ये जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिले पाहिजे.”
दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.