संगमनेरात एलसीबीचा पुन्हा बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा!
◻️ ९ जण ताब्यात, पावणेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त
◻️ मुख्य सूत्रधारांसह तिघे फरार, संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल
संगमनेर LIVE | शहरातील कादरीनगर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंशाच्या कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने शुक्रवारी (३० ऑक्टोबर) धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून ९ जणांना रंगेहात ताब्यात घेतले असून, तब्बल ९ लाख ७३ हजार ५०० रुपये किमतीचे १,९०० किलो गोमांस, एक छोटा हत्ती वाहन आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त केली आहेत. शहरात मागील काही दिवसांपासून धडक कारवाईचे सत्र सुरू आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक संगमनेर शहर हद्दीत गस्त घालत अवैध धंद्यांची माहिती घेत होते. या गस्तीदरम्यान पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, कादरीनगर येथे बेकायदेशीरपणे गोवंशाची कत्तल सुरू आहे. या माहितीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही व्यक्ती प्रत्यक्ष गोवंशाची कत्तल करताना मिळून आल्या.
पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ छापा टाकून नऊ जणांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये एका विधीसंघर्षित बालकाचा देखील समावेश आहे. या संशयितांकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी मुख्य सूत्रधार आणि आणखी एकाच्या सांगण्यावरून ही कत्तल करत असल्याची कबुली दिली. दरम्यान, हे दोन्ही मुख्य सूत्रधार आणि छोटा हत्ती वाहनाचा अज्ञात मालक घटनास्थळावरून पसार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी घटनास्थळावरून ९ लाख ७३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे १,९०० किलो गोमांस, वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे छोटा हत्ती चारचाकी वाहन, दोन कुऱ्हाडी, दोन मोठे सुरे आणि एका वजन काट्याचा समावेश आहे.
या प्रकरणी ताब्यात घेतलेले आरोपी तसेच फरार असलेले मुख्य सूत्रधार आणि वाहन मालकाविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २७१, ३२५, ३(५) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम (सुधारित २०१५) चे कलम ५(अ), ५(ब), ५(क) आणि ९ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर १०२४/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार गणेश लोंढे, राहुल द्वारके, अमृत आढाव, सतीष भवर, बाळासाहेब गुंजाळ आणि योगेश कर्डीले यांच्या पथकाने केली आहे.