मंत्रोच्चारांच्या जयघोषात आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता

संगमनेर Live
0
मंत्रोच्चारांच्या जयघोषात आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता

◻️ विश्‍वस्त, महंत, भाविकांची उपस्थिती पारंपरिक पध्दतीने ‘घट उठविण्याचा’ विधी संपन्न


संगमनेर LIVE (​तुळजापूर) | महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची आज, मंगळवार (दि. २० ऑक्टोबर) रोजी नवमीच्या शुभमुहूर्तावर मंगलमय वातावरणात सांगता झाली. मंदिराच्या परंपरेनुसार अत्यंत भक्तिभावाने व विधिवत 'घट उठविण्याचा' (घटोत्थापन) धार्मिक विधी संपन्न झाला.

​गत ११ ऑक्टोबर रोजी मंदिरात अत्यंत उत्साहात घटस्थापना करण्यात आली होती. त्यानंतर सलग नऊ दिवस मंदिरामध्ये विविध धार्मिक अनुष्ठाने, पारंपरिक पूजाअर्चा, महापूजा आणि होम-हवन मोठ्या भक्तिभावाने पार पडले. या नऊ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण तुळजापूर नगरी ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. आज नवमीच्या दिवशी सकाळी विधीवत मंत्रोच्चारात घट उठवून या नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली.

​या मंगलप्रसंगी मंदिराचे विश्‍वस्त तथा उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, नगराध्यक्ष तथा विश्‍वस्त विनोद गंगणे, तहसीलदार तथा विश्‍वस्त अरविंद बोळंगे, व्यवस्थापक (प्रशासन) तहसीलदार माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील, नागेश शितोळे, अनुप ढमाले, रामेश्‍वर वाळे यांच्यासह मानाचे महंत तुकोजीबुवा, वाकोजीबुवा, चिलोजीबुवा, हमरोजीबुवा, मंदिराचे पुजारी, मानकरी, सेवेकरी आणि राज्यभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, घट उठविण्याच्या विधीनंतर भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !