“दुष्काळाचे संकट टळून जनतेच्या जीवनात सुख-समाधान येवो”

संगमनेर Live
0
“दुष्काळाचे संकट टळून जनतेच्या जीवनात सुख-समाधान येवो”


◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांची देवी गल्लीतील जगदंबा माते चरणी प्रार्थना


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “वर्षभर कष्ट आणि धावपळ केल्यानंतर दसरा-दिवाळीसारख्या सणांच्या माध्यमातून दैनंदिन अडचणी विसरून आनंद अनुभवणे ही आपली संस्कृती आहे. यंदा राज्यात दुष्काळाचे सावट गंभीर असून, हे दुःख दूर होऊन तालुक्यातील तसेच राज्यातील जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद निर्माण होऊ दे,” अशी प्रार्थना काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

​संगमनेर शहरातील प्रसिध्द देवी गल्ली येथे शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित महाआरतीस बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती लावून जगदंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

​शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना थोरात म्हणाले, “यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवत आहे. पिके करपून गेल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. सुरुवातीच्या पावसाने धरणांमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा झाला असला, तरी आगामी उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेऊन सर्वांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर करणे गरजेचे आहे.”

​पुढे बोलताना ते म्हणाले की, "संकटे आणि अडचणी येतच असतात, मात्र सण-उत्सवांच्या माध्यमातून नवी ऊर्जा घेऊन पुन्हा उभे राहण्याची आपली परंपरा आहे. जगदंबा माता बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना या संकटातून मार्ग काढण्याचे बळ देवो.”

​दरम्यान, देवी गल्लीतील नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून शहर व परिसरातील नागरिक, महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरतीनंतर भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !