संगमनेरात विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन
◻️आमदार अमोल खताळ पाटील यांचा गणवेशात सहभाग
संगमनेर LIVE | विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संगमनेर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शिस्तबध्द पथसंचलन उत्साहात पार पडले. या संचलनात संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी पारंपरिक गणवेश परिधान करून सामान्य स्वयंसेवकाप्रमाणे पूर्ण मार्गावर पायी चालत सहभाग नोंदवला.
शहरातील अकोले नाका येथील शारदा विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी स्वयंसेवक एकत्र जमले. प्रार्थनेनंतर शिस्तबध्द संचलनाला प्रारंभ झाला. यावेळी संघाचे संघचालक सुभाष कोथिंबीर, सोपानराव देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोले नाक्यावरून निघालेले हे संचलन नगरपालिका परिसर, लालबहादूर शास्त्री चौक, रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक, देवी गल्ली, मेन रोड, माळीवाडा, नेहरू गार्डन, बी. एड. कॉलेज आणि अकोले बायपास रोड या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुढे गेले. पारंपरिक गणवेश, घोष पथकाचा ताल आणि स्वयंसेवकांची एकसमान पावले यामुळे संपूर्ण शहरात उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, संचलनाच्या मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी घरांसमोर रांगोळ्या काढून व स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केले. शिस्त, संघभावना आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या पथसंचलनाची सांगता मातोश्री मंगल कार्यालय येथे झाली.