“कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची प्रेरणा शिवविचारांतून मिळते”
◻️ पालकमंत्र्यांच्या हस्ते कोल्हार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
संगमनेर LIVE (कोल्हार) | कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून मिळते. त्यांच्या कार्यातून सामान्य माणसाच्या कल्याणाचा आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य उपयोग करण्याचा आदर्श मिळतो, असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
कोल्हार (ता. राहाता) येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा बॅकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, सुरेंद्र खर्डे, अशोक असावा, राजेंद्र कुंकुलोळ यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून या शिवस्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. स्मारक समितीच्या वतीने दुष्काळ सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश जलसंपदामंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिले स्मारक श्रीरामपूर येथे, तर दुसरे स्मारक कोल्हार येथे उभारण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा आपल्या कृतीत आणि त्यांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श प्रशासनात दिसला पाहिजे, हीच यामागची भावना आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा केंद्रबिंदू सामान्य माणूस होता. त्याच विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकार निर्णय घेत आहे. भारतीय नौदलाच्या ध्वजावर शिवमुद्रेचे बोधचिन्ह समाविष्ट करून ब्रिटिश गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचे ऐतिहासिक काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील बारा गड-किल्ल्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंद झाली आहे. सामान्य माणसाच्या हितासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्णयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब पाहायला मिळते, असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
शिवरायांचे स्मारक आपल्या सर्वांना आत्मविश्वास देते. त्यांच्या इतिहासातून प्रेरणा मिळते आणि त्यांच्या विचारांचा जागर होतो. मात्र, आज देशातील काही घटकांकडून सुरू असलेल्या आंदोलनांकडे पाहता त्यांचा संविधान आणि संवैधानिक संस्थांना विरोध असल्याचे दिसून येते. त्यांची भूमिका हिंदुत्वालाही विरोध करणारी असल्याचे मत मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले.
राज्यात सध्या दुष्काळाचे मोठे संकट असून, अशा परिस्थितीत शिवकालीन जलव्यवस्थापनाची आठवण होते. गड-किल्ल्यांवरील पाणवठे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या जलसाठ्यांतून उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य उपयोग कसा करावा, याचा आदर्श मिळतो. कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची प्रेरणा महाराजांच्या विचारांत आहे. सध्याच्या परिस्थितीत पाण्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. या संकटावर मात करण्यासाठी सरकार योग्य नियोजन करीत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, सर्व धर्म, जाती आणि पंथांतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या स्मारकाची उभारणी केली. स्मारकाच्या उभारणीतून कोल्हार ग्रामस्थांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भास्करराव खर्डे यांनी केले, तर आभार सुरेंद्र खर्डे पाटील यांनी मानले.