चणेगाव बंधाऱ्यावरून पडलेल्या तरुणाचा दुर्गापूर शिवारात मृतदेह आढळला
◻️ ३६ तासांच्या शोधमोहिमेचा अंत; झरेकाठीसह पंचक्रोशीत शोककळा
संगमनेर LIVE | संगमनेर, राहुरी आणि राहाता या तीन तालुक्यांच्या सीमेलगत असलेल्या प्रवरा नदीवरील चणेगाव बंधाऱ्यात शनिवारी सायंकाळी पडलेल्या सतीश आप्पासाहेब वाणी (वय ३४) या तरुणाचा मृतदेह अखेर सोमवारी सकाळी दुर्गापूर शिवारातील नदीपात्रात आढळून आला. तब्बल ३६ तासांहून अधिक काळ चाललेल्या शर्थीच्या शोधमोहिमेनंतर वाणी यांचा मृतदेह हाती लागल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मूळचे झरेकाठी (ता. संगमनेर) येथील रहिवासी असलेले आणि सध्या लोणी (ता. राहाता) येथे वास्तव्यास असणारे सतीश वाणी हे लोणी येथील रुग्णालयात नोकरीस होते. शनिवारी (दि. १७) सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास ते चणेगाव येथील बंधाऱ्याजवळ गेले होते. तेथे ते अचानक बंधाऱ्यातील पाण्यात पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तातडीने प्रशासनाला ही माहिती कळवली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रात्रीच्या काळोखामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीची मोहीम थांबवून रविवारी पहाटेपासून शोधकार्य अधिक तीव्र करण्यात आले. घटनास्थळी वाणी यांची दुचाकी आणि मोबाईल देखील आढळून आला होता.
रविवारी (दि. १८) सकाळपासून आश्वीचे सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, जलसंपदा विभाग, तसेच राहाता, राहुरी व श्रीरामपूर येथील अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी बोटींच्या साहाय्याने बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात कसून शोध घेतला. दिवसभर पाण्यात उतरून शोधमोहीम राबवली गेली; परंतु पाण्याची खोली आणि पात्रातील प्रवाहामुळे दिवस अखेरपर्यंत सतीश वाणी यांचा कोणताही सुगावा लागू शकला नव्हता.
तर, या शोधमोहिमेदरम्यान झरेकाठीचे सरपंच अशोक वाणी, पोलीस पाटील सुदाम वाणी, पोलीस उपनिरीक्षक दीपक बर्डे, अग्निशमन दलाचे पवन देवरे, सुरेश वाघ, करण साळवे, ऋषिकेश सदाफळ, प्रशांत डांगे, दिनेश बागडे, शरद साठे, अनिल जाधव, सुनील जाधव, श्री. शेख यांच्यासह दोन्ही तालुक्यांतील बचाव पथक आणि स्थानिक तरुणांनी अखंड प्रयत्न केले.
रविवारी दिवसभर शोध लागला नसताना, सोमवारी (दि. १९) सकाळी दुर्गापूर शिवारातील नदीपात्रात स्थानिक नागरिकांना एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. पोलीस पाटील दिलीप पुलाटे यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला असता, तो सतीश वाणी यांचाच असल्याची खात्री झाली. कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लोणी येथील रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान, सतीश वाणी हे शनिवारी सायंकाळी चणेगाव बंधाऱ्यावर नेमके कोणत्या कारणासाठी गेले होते? ते पाण्यात पडले की यामागे काही अन्य प्रकार आहे? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या अनुषंगाने पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून स्थानिक नागरिकांकडूनही अधिक माहिती जाणून घेतली जात आहे. एक उमदा व मनमिळाऊ तरुण अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू पावल्याने झरेकाठी परिसरात दुःख व्यक्त होत आहे.