तुळजापुरात दुर्गाष्टमीनिमित्त आई तुळजाभवानीची ‘महिषासुरमर्दिनी’ रुपात पूजा
◻️जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार सपत्नीक पूजा संपन्न
संगमनेर LIVE (तुळजापूर) | महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात सोमवारी (१९ ऑक्टोबर) दुर्गाष्टमीचा मुख्य धार्मिक विधी अत्यंत मंगलमय व उत्साही वातावरणात पार पडला. मंदिर परिसरातील मुख्य होमकुंडावर पारंपरिक वेदोक्त मंत्रोच्चारात होम-हवन विधी संपन्न झाला. या पवित्र यज्ञामध्ये कोहळा आणि नारळाची पूर्णाहुती देऊन होमाची सांगता करण्यात आली.
मंदिराच्या मुख्य होमकुंडावरील होम-हवन विधीचे मुख्य यजमानपद जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार व त्यांच्या पत्नी सौमय्याश्री पुजार यांनी भूषविले.
याशिवाय, मंदिराच्या पारंपरिक पध्दतीनुसार गणेश विहार येथे कोल्हापूर संस्थानच्या वतीने आयोजित होमात प्रतिपचंद्र प्रयाग व मंदा प्रयाग यांनी, तर हैदराबादच्या रावबहादूर संस्थानच्या वतीने आयोजित होमात विनीत कोंडो व स्वप्नाली कोंडो यांनी यजमान म्हणून धार्मिक विधी पूर्ण केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यासह संस्थानचे विश्वस्त, अधिकारी, महंत आणि पुजारी उपस्थित होते.
दुर्गाष्टमीचे औचित्य साधून आई तुळजाभवानीची ‘महिषासुरमर्दिनी’ अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. आख्यायिकेनुसार, स्वर्गावर ताबा मिळवून देवतांवर अत्याचार करणाऱ्या महिषासुर दैत्याचा आदिशक्तीने संहार केला होता. देवीच्या या शौर्य, पराक्रम आणि दुष्टसंहारक स्वरूपाचे स्मरण म्हणून दरवर्षी दुर्गाष्टमीला ही विशेष अलंकार पूजा बांधली जाते. देवीचे हे अलौकिक व रौद्र रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
तत्पूर्वी, रविवारी (१८ ऑक्टोबर) रात्री तुळजाभवानी मातेची पारंपरिक अश्वारूढ छबिना मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात काढण्यात आली होती.