संजय गांधी निराधार समितीत दिव्यांग बांधवाना संधी देणार - आमदार अमोल खताळ
◻️ हजारो कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधवांचा शिवसेनेत प्रवेश
संगमनेर LIVE | दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी थेट शासन दरबारी मांडल्या जाव्यात यासाठी तालुक्यातील ‘संजय गांधी निराधार अनुदान योजने’च्या समितीवर दिव्यांग बांधवांच्या वतीने सुचविण्यात येणाऱ्या एका प्रतिनिधीला शासकीय सदस्य म्हणून संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. शासकीय योजनांचा लाभ घेताना दिव्यांग बांधवांची कोणतीही अडवणूक किंवा अन्याय सहन केला जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यासह पठार भागातील हजारो कार्यकर्ते, महिला, युवक तसेच शेकडो दिव्यांग बंधू-भगिनींनी आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यावेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आदिशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. नीलम खताळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, युवासेना उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे, उपतालुकाप्रमुख रणजीत जाधव, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, सुनिता कुरकुटे, गोविंद भरीतकर, सुरेश ढोकरे, निलेश सातपुते, नंदाताई खेमनर, अजय धुळगंड, गोकुळ मेहेत्रे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधताना आमदार खताळ म्हणाले, “दिव्यांग बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने केवळ पक्षाची ताकद वाढली असे नाही, तर त्यांच्या सुख-दुःखात धावून जाण्याची आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. मी संजय गांधी समितीचा अध्यक्ष असताना दिव्यांग बांधवांची अनेक प्रकरणे मार्गी लावली होती. रेशनकार्डसह इतर योजनांसाठी त्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत.” तळागाळातील सामान्य, शेतकरी आणि दिव्यांग घटकांचे प्रश्न सोडवणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय कार्यालयांत योजनांचा लाभ मिळवताना दिव्यांग बांधवांना कोणी त्रास देत असेल किंवा त्यांची अडवणूक करत असेल, तर शिवसैनिकांनी तात्काळ त्यांच्या मदतीला धावून जावे आणि अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असे थेट निर्देश आमदार खताळ यांनी दिले. यासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागणारे शैक्षणिक दाखले व इतर योजना मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी समन्वयक म्हणून काम करण्याचे आवाहन केले.
महिला सक्षमीकरणाचा उल्लेख करताना आमदार खताळ यांनी सांगितले की, बचत गटांच्या माध्यमातून महिलांसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'मध्ये ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक चुकांमुळे ज्या महिलांचे हप्ते बंद झाले आहेत, त्यांना पुन्हा पडताळणीची संधी मिळावी म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. ही संधी मिळताच शिवसैनिकांनी थेट महिलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे अर्ज पुन्हा सक्रिय करण्यास मदत करावी, अशी सूचना त्यांनी केली.
"शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य मान-सन्मान मिळतो. पक्षात लहान-मोठा असा भेद नसून जनसेवा हाच मुख्य उद्देश आहे. पक्षात प्रवेश घेतल्यानंतर कार्यकर्त्यांची सामाजिक जबाबदारी वाढते. त्यामुळे प्रत्येकाने सामान्यांच्या सुख-दुःखात धावून जावे.” असे आवाहन रमेश काळे यांनी केले.
“दिव्यांग बांधवांनी पक्षावर व आमदार अमोल खताळ यांच्यावर दाखवलेला विश्वास प्रेरणादायी आहे. कुटुंबप्रमुखाप्रमाणे संघटनेतील प्रत्येकाला प्रेम आणि आधार देणे आमचे कर्तव्य आहे. शारीरिक मर्यादा असल्या तरी मनाचे सामर्थ्य मोठे असते; दिव्यांगांनी खंबीर राहून आपली क्षमता सिध्द करावी.” अशा भावना सौ. नीलम खताळ यांनी व्यक्त केल्या.