टंचाईग्रस्त भागांत शिवसेना पाण्याचे टॅकर सुरू करणार - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
टंचाईग्रस्त भागांत शिवसेना पाण्याचे टॅकर सुरू करणार - आमदार अमोल खताळ 

◻️ लक्ष्मीपूजनानंतर माध्यमांशी संवाद साधताना तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर केले भाष्य


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक सध्या भीषण दुष्काळाचा सामना करीत आहेत. तीव्र पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि आर्थिक अडचणींमुळे यंदा अनेकांना दिवाळी साजरी करणेही शक्य झाले नाही. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही यंदाची दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी केली आहे. आगामी काळात शासकीय पातळीवरून टॅकर सुरू होतीलच; मात्र आवश्यक त्या सर्व टंचाईग्रस्त भागात शिवसेनेच्या वतीनेही पिण्याच्या पाण्याचे टॅकर सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.

​दिवाळीनिमित्त शहरातील जनसंपर्क कार्यालयात आमदार अमोल खताळ यांनी पत्नी सौ. नीलम खताळ यांच्यासह लक्ष्मीपूजन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले.

​आमदार खताळ म्हणाले, “दुष्काळामुळे ज्या कुटुंबांना सण साजरा करणे शक्य नव्हते, अशा भागांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झालो. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांच्यासोबत उभे राहणे आणि त्यांना धीर देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे.” असे सांगितले.

​तालुक्यात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता किती आहे, टंचाईग्रस्त गावांमध्ये कोणत्या तातडीच्या उपाययोजना हव्यात आणि पशुधनाच्या चाऱ्यासाठी काय नियोजन आहे, याचा संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून दररोज आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सर्वांच्या सहकार्याने या दुष्काळावर मात करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

​दुष्काळावर केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी मात करण्यासाठी आगामी काळात जलसंवर्धन व वृक्षसंवर्धनाच्या कामांना प्राधान्य दिले जाईल. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून भूजलपातळी वाढवण्यासाठी नियोजनबध्द जलसंधारण प्रकल्प राबविले जातील, असेही आमदार अमोल खताळ यांनी नमूद केले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !