स्व. पवळा भालेराव लोककला महोत्सवासाठी निधी मंजूर - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
स्व. पवळा भालेराव लोककला महोत्सवासाठी निधी मंजूर - आमदार अमोल खताळ

◻️ हिवरगाव पावसा येथे रंगणार महोत्सव व पुरस्कार सोहळा


​संगमनेर LIVE (अनिल शेळके) | ​संगमनेर तालुक्यातील लोककलेची समृध्द परंपरा जतन करण्यासाठी आणि तमाशा कलावंतांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हिवरगाव पावसा येथील पहिल्या महिला तमाशा कलावंत स्व. पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केल्या जाणाऱ्या लोककला महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी हा निधी मिळाला असून, आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.

​तमाशा कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचे स्मरण व्हावे आणि नव्या पिढीला लोककलेची ओळख व्हावी, या उद्देशाने आमदार खताळ यांनी मागील वर्षापासून तालुक्यातील ज्येष्ठ तमाशा कलावंतांच्या नावाने पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मागील वर्षी स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने वाई येथील ज्येष्ठ कलावंत आवळे मास्तर यांना सन्मानित करण्यात आले होते.

​यंदा हिवरगाव पावसा येथील स्व. पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मरणार्थ लोककला महोत्सव व पुरस्कार सोहळा आयोजित करण्याची घोषणा आमदार खताळ यांनी केली होती. या महोत्सवासाठी अंदाजे ९ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

​या मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी विभागाच्या सचिवांकडे निधीची तरतूद करण्याची शिफारस केली. त्यानुसार सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव बाळासाहेब सावंत यांनी खर्चास प्रशासकीय मान्यता देत ६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे हिवरगाव पावसा येथे लवकरच हा सोहळा पार पडणार असून, त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

​“संगमनेर तालुक्याला लोककलेची मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचे योगदान पुढील पिढीपर्यंत पोहोचावे आणि त्यांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने स्व. पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मरणार्थ लोककला महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला. सांस्कृतिक कार्य विभागाने ६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात येईल.” अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !