जनता दरबारात मंत्री विखे पाटलांकडून नागरिकांच्या समस्यांचे निवारण
◻️ दुष्काळी उपाययोजनांच्या आढाव्यासाठी पालकमंत्री पुन्हा तालुक्याच्या दौऱ्यावर!
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | दुष्काळी परीस्थीतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला उपाय योजनाच्या दिलेल्या सूचनांच्या अमंलबजावणीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक तालुक्याचा दि. २२ नोव्हेंबर पुन्हा दौरा करणार असून, झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेणार असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
प्रवरानगर येथे डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात मंत्री विखे पाटील यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातून आलेल्या नागरीकांची निवेदन स्विकारून समस्या जाणून घेतल्या. अनेक निदेनावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
अनेक गावातून आलेल्या शिष्टमंडळाच्या समवेत चर्चा करून गावांचे प्रश्न समजावून घेतले.सार्वजनिक कामाबाबत अधिकार्यांनी अतिशय गांभीर्याने लक्ष देवून काम पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील दुष्काळाची गंभीरता लक्षात घेवून यापुर्वी प्रत्येक तालुक्यात टंचाई आढावा बैठका घेवून पाणी चारा, पाणी पुरवठा योजना यासंदर्भात प्रशासनाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. झालेल्या अमंलबजावणी बाबत पुन्हा प्रत्येक तालुक्यात जावून आपण शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद करणार असून या माध्यमातूनही राहीलेल्या समस्यांवर उपाय योजना करणे अधिक सोयीचे होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तातडीने कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांचा सविस्तर अहवाल मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला असल्याने निधीची उपलब्धता होईल असा विश्वास व्यक्त करून, सद्य परिस्थितीत मागणी प्रमाणे टॅकरची उपलब्धता करून देण्यात येत आहे. पाण्याच्या फिल्टर प्लॅन्टची व्यवस्था करण्याच्या कार्यवाहीला प्राधान्य देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांची पाण्याची मागणी चुकीची नाही. मात्र, जिल्ह्यातील धरणामध्ये उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यानूसार पुढील वर्षासाठीचे नियोजन केले आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठका झाल्या आहेत. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यानूसार कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. उपलब्ध पाण्यातून गरज भागवून शेतीच्या पाण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई असली तरी, उपलब्ध पाण्यातून आवर्तनाचे नियोजन केले आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून, पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता गावपातळीवरील तलाठी ग्रामसेवक यांनी घ्यावी.
वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवावी. यापुढे ज्या भागातून वाळू उपसा होत असेल तिथल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा कडक इशारा त्यानी यानिमिताने दिला. सरकारची प्रतिमा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर अवलंबून असते. त्यामुळेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून निष्काळजीपणा अपेक्षित नसल्याचे म्हणाले.
जिल्ह्यातील चारा टंचाई बाबतीत हायड्रोपोनिक्स सारख्या तंत्रज्ञानाचा प्रयोग जिल्ह्यात करण्यात येत असून, यापुर्वी बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राने यावर मोठे काम केले होते. कमी खर्च आणि कमी पाण्यात चारा उत्पादन घेण्यासाठी याचा उपयोग होईल. यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यामातून निधी उपलब्ध करण्याची तयारी असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.