अमृतवाहिनी बॅकेमुळे ग्रामीण अर्थकारणाला बळ मिळेल - बाळासाहेब थोरात
◻️ साकुर फाटा येथे अमृतवाहिनी सहकारी बॅकेच्या १४ व्या शाखेचे उध्दघाटन
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “समृध्दी महामार्ग आणि वाढवण बंदर महामार्गामुळे इगतपुरी व साकुर परिसराची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, हा परिसर विकासाचे मुख्य केंद्र बनणार आहे. या बदलत्या परिस्थितीत अमृतवाहिनी सहकारी बॅकेची नवीन शाखा येथील शेतकरी, नवउद्योजक आणि तरुणांच्या प्रगतीसाठी मोठा आधार ठरेल,” असा विश्वास काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
साकुर फाटा (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बॅकेच्या १४ व्या शाखेच्या उध्दघाटन प्रसंगी बाळासाहेब थोरात बोलत होते. खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार शिवराम झोले, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, बॅकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती, नारायण वाजे, निवृत्ती जाधव, उत्तमराव सहाने, के. के. थोरात, कचरू डुकरे, उत्तमराव झनकर, नंदू गाढवे, सुनील सहाने, बाळासाहेब कुकडे, मिलिंद कुकडे, आत्माराम फोकणे, रंगनाथ भगत, माणिकराव फोकणे, दशरथ वर्पे, विष्णुपंत रहाटळ आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “इगतपुरी आणि या परिसराशी आपला जुना ऋणानुबंध आहे. एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हजारो रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहे. हे हॉस्पिटल या विभागाचे मुख्य आरोग्य केंद्र बनले आहे. आता बॅकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, ठेवीदार आणि कर्जदारांचा विश्वास संपादन करून या भागाचा आर्थिक विकास साधला जाईल. प्रत्येकाने या नव्या बदलांसोबत आपली प्रगती साधावी,” असे आवाहनही त्यांनी केले.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी संगमनेरच्या सहकार चळवळीचे कौतुक केले. ते म्हणाले की, “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर उभा राहिलेला संगमनेरचा सहकार देशाला दिशादर्शक आहे. सध्या सहकार क्षेत्रात अनेक आव्हाने असतानाही, खंबीर नेतृत्वामुळे अमृतवाहिनी बॅक सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत आहे. या शाखेचा या विभागाला निश्चितच मोठा फायदा होईल.” असे त्यांनी नमूद केले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले की, “एसएमबीटी हॉस्पिटलने सर्वसामान्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत लोकसेवेचे उदाहरण घालून दिले आहे. खाजगी क्षेत्राकडून होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी सहकार क्षेत्राची नितांत गरज असून, या चळवळीला अधिक बळकटी देण्याचे आवाहन त्यांनी केले.”
प्रास्ताविकात चेअरमन सुधाकर जोशी यांनी बॅकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. “डिजिटल प्रणाली आणि मोबाईल बॅकिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा देत बॅकेने राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. आज बॅकेची एकूण उलाढाल १२५० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर संचालक राजू गुंजाळ यांनी आभार मानले. या सोहळ्याला बॅकेचे सर्व संचालक, साकुर व परिसरातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.